रविवार, १४ एप्रिल, २०२४

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे वास्तवभान

 (भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीच्या निमित्ताने 'दै. पुढारी'च्या साप्ताहिक बहार पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला विशेष लेख या ठिकाणी माझ्या ब्लॉग वाचकांसाठी मूळ स्वरुपात शेअर करीत आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)



भारतीय समाजव्यवस्था संसदीय लोकशाहीशी विसंगत आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भारतात १९५२च्या पहिल्या निवडणुका झाल्यानंतर जून १९५३मध्ये बीबीसीसाठी एडन क्रॉली यांनी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये बाबासाहेबांनी उपरोक्त विधान केले. भारतीय नागरिक जोपर्यंत त्याच्या विषमतावादी, जातीयवादी मानसिकतेमधून बाहेर पडत नाही आणि वर्तनाच्या पातळीवर तो स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही लोकशाही मूल्ये आत्मसात करीत नाही, तोवर या देशात खऱ्या अर्थाने लोकशाही रुजणे अशक्य आहे, असे त्यांचे मत होते. खरे तर, ही त्यांची चिंता होती. भारतीय समाज हा त्याच्या जातजाणिवांतून बाहेर पडावा, जातिगत संवेदनांचा त्याग करून त्याच्यात समग्र देशबांधवांप्रती संवेदनांचा विकास व्हावा, भारत हा मानवीय पातळीवर एक व्हावा, त्याच्यात एकराष्ट्रीयत्वाची सच्ची भावना जागृत व्हावी, यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर परिश्रम घेतले होते. बाबासाहेब सातत्याने लोकशाही मूल्यांसाठी आग्रही राहिले. विशेषतः भारतीय समाजामध्ये त्यांची अग्रक्रमाने प्रस्थापना होणे त्यांना आवश्यक वाटत होते. त्यांच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्याचा पायाच मुळी या देशात समताधिष्ठित समाजाचा विकास हा होता. बाबासाहेबांचा लढा केवळ दलितमुक्तीसाठी होता, हे अर्धसत्य आहे. ते लढले अखिल मानवमुक्तीसाठी, हे पूर्णसत्य. कारण जोवर या देशातील नागरिक चातुर्वर्णीय स्तरित मानसिकतेमधून बाहेर पडत नाही, तोवर तो एकसंध समाज म्हणून कधीही एकत्र येऊ शकणार नाही. बाबासाहेबांचा संपूर्ण जीवनलढा हा त्यासाठी होता. म्हणून या देशात लोकशाहीच्या माध्यमातून मानवतावादी मूल्यांची प्रतिष्ठापना हा त्यांच्या प्राधान्यक्रमावरील महत्त्वाचा विषय होता. मात्र, भारतीय संविधानाच्या माध्यमातून भारतीय समाजाला प्रदान केलेली ही मूल्ये येथील प्रत्येक व्यक्तीच्या आचरणामध्ये उतरली, तरच ती खऱ्या अर्थाने रुजतील, अन्यथा नाही, याचे इशारे त्यांनी संविधानाच्या निर्मितीनंतरही वेळोवेळी देऊन ठेवले आहेत.

संविधान सभेच्या कामकाजाला ९ डिसेंबर १९४६ पासून सुरवात झाली. ३१ डिसेंबर १९४६ रोजी संविधानाचे साध्य आणि उद्दिष्ट सांगणारा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. पुरूषोत्तमदास टंडण यांनी ठरावाला अनुमोदन देणारे भाषण केले. डॉ. एम.आर. जयकर यांनी मुस्लीम लीग आणि भारतीय संस्थानिकांच्या प्रतिनिधींचे सहकार्याची गरज व्यक्त केली. ते सहभागी होईपर्यंत या ठरावावरील चर्चा पुढे ढकलावी, असे मत व्यक्त केले. साहजिकच बहुतेक सदस्यांनी त्यांच्या या दुरुस्तीला विरोध केला. या पार्श्वभूमीवर १७ डिसेंबर १९४६ रोजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव बोलण्यासाठी पुकारले. संविधान सभेचे कामकाज सुरू झाल्याच्या नवव्या दिवशी त्यांचे पहिले भाषण झाले. तोवर डॉ. आंबेडकर यांच्याविषयी त्या सभेत बसलेल्या देशभरातील नेत्यांमध्ये त्यांच्याविषयी अनेक ग्रह-पूर्वग्रह होते. जयकरांप्रमाणे तेही आता सभागृहाचा रोष ओढवून घेतील, असेच अनेकांना वाटले. पण, प्रत्यक्षात त्यांचे भाषण इतके प्रभावी झाले की, त्यानंतर सभागृहाबाहेर लॉबीमध्ये त्यांचे अभिनंदन करण्यासाठी सदस्यांनी गराडा घातला. खरे तर, इतक्या लवकर सभेत आपल्याला बोलण्याची संधी मिळेल, असे त्यांना वाटले नव्हते. त्यामुळे त्यांनी भाषणाची अशी तयारी केलेली नव्हती. तरीही त्यांनी अत्यंत मुद्देसूद, आशयगर्भ आणि दिशादर्शक मांडणी केली. “आज आपण राजकीय, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या विभागलेले आहोत, याची मला जाणीव आहे. आपण एक-दुसऱ्याच्या विरुद्ध लढणाऱ्या छावण्यांचा समूह आहोत. आणि मी तर यापुढेही जाऊन हेही मान्य करेन की, बहुशः एका छावणीचा मीही एक नेता आहे. परंतु, हे सर्व खरे असले तरी मला पूर्ण खात्री आहे की, अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही. विभिन्न जाती आणि संप्रदाय असले तरी आपण एकसंध झाल्याशिवाय राहणार नाही, याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही.असा प्रखर आत्मविश्वास बाबासाहेब व्यक्त करतात. आपल्या विरोधकांचे पूर्वग्रह लक्षात घेऊन त्यांना काही सवलती देऊ या, त्यांना सोबत घेऊ या, जेणेकरून आपण ज्या मार्गावरून वाटचाल करीत आहोत, त्या मार्गावर ते स्वखुशीने येऊन मिळतील. या मार्गावर जर आम्ही सर्वांनी दीर्घकाळ वाटचाल केली तर, तीच आम्हाला निश्चितपणे ऐक्याकडे घेऊन जाईल, असा विश्वास ते सभेला देतात. हा विश्वास सुनिश्चित करण्याच्या दिशेनेच बाबासाहेबांनी त्यापुढील काळात राज्यघटनेची संरचना केल्याचे दिसते. एकसंध समाजनिर्मितीसाठी आवश्यक तमाम मूल्यांचे समावेशन त्यांनी त्यात केले.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे समारोपाचे भाषण होऊन संविधान संमत झाले. त्या आधी एक दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अविश्रांत आणि विद्वत्तापूर्ण योगदानाचा गौरव संविधान सभेतील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केला. त्यावेळी अर्थात २५ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. आंबेडकर यांचे भारतीय समाजाला जबाबदाऱ्यांची जाणीवा करून देणारे अत्यंत महत्त्वाचे भाषण झाले.

सुमारे ५५ मिनिटांच्या या अंतिम ऐतिहासिक भाषणात त्यांनी संविधानाच्या समोरील प्रमुख आव्हानांचा वेध घेऊन काही बाबींच्या संदर्भात निःसंदिग्ध इशारा देऊन ठेवला आहे. ते म्हणतात, “संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील, तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच, संविधान कितीही वाईट असो, ते राबविणारे जर प्रामाणिक असतील, तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णतः संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग जसे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका निर्माण करून देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वतःच्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे. भारतातील लोक आणि राजकीय पक्ष कसे वागतील, हे कोण सांगू शकेल? आपल्या उद्दिष्टपूर्तीसाठी ते संवैधानिक मार्गांचा अवलंब करतील की क्रांतीकारी मार्गांचा? त्यांनी क्रांतीकारी मार्गांचा अवलंब केल्यास संविधान कितीही चांगले असो, ते अयशस्वी होईल, हे सांगण्यासाठी भविष्यवेत्त्याची गरज नाही. म्हणून भारतीय लोक आणि त्यांचे राजकीय पक्ष कसे वागतील, हे जाणून घेतल्याशिवाय संविधानाबाबत कोणताही निर्णय घेणे निरर्थक ठरेल.”

भारताच्या स्वातंत्र्याचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य अबाधित ठेविल की पुन्हा गमावून बसेल? भवितव्याबाबतचा हाच विचार मला सर्वाधिक चिंताग्रस्त करीत असल्याचे सांगून बाबासाहेब म्हणतात की, भूतकाळात भारताने केवळ आपले स्वातंत्र्य गमावले, असे नव्हे, तर देशातील काही लोकांच्या बेईमानी आणि विश्वासघातामुळे गमावले गेले, ही वास्तविकता मला अधिक अस्वस्थ करते.... जातींच्या आणि संप्रदायांच्या स्वरुपातील आपल्या जुन्या शत्रूंसोबत भिन्न आणि परस्परविरोधी विचारप्रणाली असणाऱ्या बऱ्याच राजकीय पक्षांचीही त्यात भर पडणार आहे. भारतीय लोक आपल्या तत्त्वप्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा तत्त्वप्रणालीला मोठे मानतील, मला माहित नाही. परंतु एवढे मात्र निश्चित की जर पक्षांनी स्वतःच्या तत्त्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले, तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. आणि कदाचित कायमचे घालविले जाईल. या संभाव्यतेविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे.

भारतीय लोकशाहीसमोरील आव्हानांचीही चर्चा बाबासाहेबांनी या भाषणात केली आहे. भारताला लोकशाही म्हणजे काय, हे माहित नव्हते, असे नाही. एक काळ असा होता की, भारत हा गणराज्यांनी भरगच्च होता आणि जिथे कुठे राजेशाही असेलच तर ती एक तर निवडलेली असायची किंवा सीमित असायची. त्या प्रणाली कधीही अनिर्बंध नव्हत्या. बौद्ध भिक्खू संघाच्या माध्यमातून भारताला संसद आणि संसदीय प्रणाली यांचा परिचय होताच. ही लोकसत्ताक पद्धती भारताने गमावली. पुन्हा दुसऱ्यांदा तो ती गमावणार का, मला माहित नाही. परंतु, भारतासारख्या देशात हे सहजशक्य आहे की, लोकशाही प्रदीर्घ काळपर्यंत उपयोगात नसल्यामुळे ती अगदीच नवीन भासण्याची शक्यता आहे- जिथे लोकशाहीने हुकूमशाहीला स्थान देण्याचा धोका आहे. हे सहजशक्य आहे की, नव्यानेच जन्माला आलेली लोकशाही आपले बाह्य स्वरुप सांभाळेल, परंतु प्रत्यक्षात ती हुकूमशाहीला स्थान देईल. जर प्रचंड बहुमत असले तर दुसरी शक्यता वास्तवात येण्याचा मोठा धोका आहे.

लोकशाही अस्तित्वात येण्यासाठी काय करायला हवे, हे सांगताना बाबासाहेब म्हणतात की, पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे. याचा अर्थ हा की, क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णतः दूर सारला पाहिजे. याचा अर्थ कायदेभंग, असहकार, सत्याग्रह या मार्गांना दूर ठेवले पाहिजे. जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत, तेव्हा असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे. जितक्या लवकर त्यांना दूर सारू, तेवढे ते आपल्या हिताचे आहे.

भारतीय समाजाला आणखी एक सर्वाधिक महत्त्वाचा इशारा बाबासाहेब देतात, तो हा की, “भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणतात येईल तो, किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल; परंतु, राजकारणात भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.” त्याचबरोबर राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत परिवर्तनाची गरजही अधोरेखित करतात. ते म्हणतात, “राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही. सामाजिक लोकशाही एक असा मार्ग आहे, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्त्वे म्हणून मान्यता देतो. या त्रयीची एकमेकांपासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय.” हजारो जातींमध्ये विखुरलेल्या लोकांचे एक राष्ट्र होऊ शकत नाही. सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही, याची जाणीव आम्हाला जेवढ्या लवकर होईल, तितके ते आमच्या हिताचे ठरेल, असेही बाबासाहेबांनी सांगून ठेवले आहे.

क्रांती आणि प्रतिक्रांतीमध्ये बाबासाहेबांनी राष्ट्र आणि राष्ट्रीयता म्हणजे नेमके काय, हे फार विस्तृतपणे सांगितले आहे. राष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिकदृष्ट्या कितीही एकात्म असलेला प्रदेश नव्हे. राष्ट्र म्हणजे केवळ समान भाषा, समान धर्म, समान वंश यातून निर्माण झालेल्या समान संस्कृतीचे लोक नव्हेत. राष्ट्रीयता ही एक आत्मनिष्ठ मानसिकता आहे. ही एक अशी भावना आहे की ज्यात सर्वांमध्ये सामूहिक एकतेची भावना असते आणि त्यामुळे आपण सर्व आप्तसंबंधी आहोत, असे त्यांना वाटते. ही राष्ट्रीय भावना दुहेरी स्वरुपाची असते व दुसरीकडे जे आपले नाहीत त्यांच्याबाबत बंधुत्वाच्या भावनेचा विरोध आढळून येतो. आपल्या स्वतःच्या गटात राहण्याची इच्छा आणि दुसऱ्या गटात न जाण्याची इच्छा त्यात असते. आणि जे आपल्या गटाच्या बाहेर आहेत, त्यांच्याशी संबंध न बाळगण्याची इच्छाही त्यात असते. राष्ट्रीयत्वाचा आणि राष्ट्रीय भावनेचा हा गाभा आहे. स्वतःच्या गटातील लोकांतच राहण्याची इच्छा ही एक मानसिक, आत्मकेंद्रित अवस्था आहे. या भावनेचा भूगोलाशी, संस्कृतीशी, आर्थिक प्रश्नांशी वा सामाजिक संघर्षाशी काही संबंध नसतो. भौगोलिक एकात्मता असूनही या भावनेचा अभाव असू शकतो आणि भौगोलिक एकात्मता नसतानाही ही भावना अत्यंत प्रबळ असू शकते. सांस्कृतिक एकता असूनही या भावनेचा अभाव असू शकतो आणि आर्थिक व वर्गीय संघर्ष असूनही आपण या गटाचे आहोत, या राष्ट्राचे आहोत, ही भावना प्रखर होऊ शकते. मुख्य मुद्दा असा की, राष्ट्रीयता हा केवळ भूगोल, संस्कृती यांच्याशी संबंध असलेला प्रश्न नाही.

असे जर असेल तर मग भारतासारख्या देशात खऱ्या अर्थाने लोकशाही यशस्वी होण्यासाठी काय करावे लागेल. कोणत्या बाबींचे भान राखायला हवे, याचीही चर्चा बाबासाहेबांनी पुणा डिस्ट्रिक्ट लॉ लायब्ररीमध्ये केलेल्या भाषणात केली आहे. या भाषणात लोकशाहीच्या त्यांना अभिप्रेत असलेल्या व्याख्येपासून अनेक गोष्टींचा ऊहापोह त्यांनी केला. गेट्टीसबर्ग येथील भाषणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी लोकांचे, लोकांनी व लोकांच्यासाठी चालविलेले शासन म्हणजे लोकशाही, अशी लोकशाहीची व्याख्या केली. लोकांना लोकशाहीची जाणीव करून देणाऱ्या अशा अनेक व्याख्या असल्याचे बाबासाहेब सांगतात. आपल्याला अभिप्रेत लोकशाहीची व्याख्या सांगताना बाबासाहेब म्हणतात की, रक्तपाताशिवाय लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनात क्रांतीकारी बदल घडवून आणणाऱ्या शासन व्यवस्थेच्या प्रकारास आणि पद्धतीस लोकशाही म्हणतात.

केवळ लोकशाहीची व्याख्या सांगून बाबासाहेब थांबत नाहीत, तर त्यापुढे जाऊन लोकशाहीच्या यशस्वितेसाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत, याचीही साद्यंत चर्चा करतात. त्या बाबी अशा-

विषमताविरहित समाजव्यवस्था: लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाची पहिली शर्त म्हणजे समाजामध्ये भयानक विषमता असता कामा नये. पिळलेला, दडपलेला वर्ग असता कामा नये. ज्याला सर्व विशेषाधिकार आहेत व जो केवळ ओझ्याचा बैल आहे, असे वर्ग समाजात असता कामा नयेत. समाजाच्या या व्यवस्थेत व विभाजनात रक्तरंजित क्रांतीची बीजे असतात आणि कदाचित हे दुखणे नाहीसे करणे लोकशाहीला अशक्य होईल. जगातील वेगवेगळ्या भागातील लोकशाहीच्या इतिहासाची तपासणी केली असता असे आढळते की, सामाजिक विषमता हे लोकशाहीच्या नाशाला कारणीभूत होणाऱ्या कारणांपैकी एक महत्त्वाचे आहे.

विरोधी पक्षाचे अस्तित्व व माध्यमांची भूमिका: हा मुद्दा स्पष्ट करताना बाबासाहेब लोकशाहीच्या कार्यासंबंधी चिंतन करतात. त्या अनुषंगाने ते लोकशाहीला नकारशक्ती मानतात. अनुववंशिक अधिकार किंवा स्वयंसत्ताक अधिकार यांचा प्रतिशोधक म्हणजे लोकशाही. ज्यांची देशावर सत्ता आहे त्यांच्या अधिकारावर कोठे तरी केव्हा तरी नकाराधिकार वापरणे म्हणजे लोकशाही, असे सांगतात. स्वयंसत्ताक राज्यव्यवस्थेत नकाराधिकार नसतो. राजाची एक वेळ नियुक्ती झाल्यानंतर अनुवंशिक किंवा दैवी अधिकार म्हणून तो राज्य करतो. परंतु लोकशाहीत सत्तेवर असणाऱ्यांना दर पाच वर्षांनी जनतेला सामोरे जावे लागते. तथापि, या पाच वर्षांच्या मधल्या काळात सत्ताधाऱ्यांना जाब विचारणाऱ्या तात्काळ नकाराधिकाराची लोकशाहीला फार आवश्यकता असते. जे शासनाला तेथेच आणि त्यानंतर तात्काळ आव्हान करू शकतील, अशा लोकांची संसदेत नितांत आवश्यकता असते. लोकशाही म्हणजे राज्य करण्याचा कोणाचाही अखंड अधिकार नव्हे. राज्य करण्याचा अधिकार हा लोकांच्या मान्यतेला बांधलेला असतो व त्याला संसदेत आव्हान करण्यासाठी विरोधी पक्ष ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरते. सत्याधाऱ्यांनी त्यांच्या पक्षाला न मानणाऱ्या लोकांसाठी केलेल्या प्रत्येक कृतीचे समर्थन करणे, यालाच विरोधी पक्ष म्हणतात.

याठिकाणी बाबासाहेब माध्यमांच्या भूमिकेविषयीही प्रश्न उपस्थित करतात. आपल्या देशातील सर्व वृत्तपत्रे कोणत्या तरी एका कारणासाठी किंवा अन्य काही कारणांसाठी जाहिरातीपासून उत्पन्न उपटण्याचे साधन आहे. अशी वृत्तपत्रे शासनाला विरोधी पक्षापेक्षा जास्त प्रसिद्धी देतात. कारण त्यांना विरोधी पक्षाकडून जाहिरातीचे उत्पन्न मिळत नाही. शासनाकडून उत्पन्न मिळते आणि मग साहजिकच सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी केलेल्या भाषणांच्या वृत्तांताने वर्तमानपत्रांचे स्तंभच्या स्तंभ भरतात आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांच्या भाषणाचे वृत्तांत कोठेतरी शेवटच्या पानावर शेवटच्या स्तंभात दिले जातात. वृत्तपत्रांनीही लोकशाहीत विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याची गरज बाबासाहेब येथे व्यक्त करतात.

कायदा व प्रशासन यांसमोरील समानता: कायद्यासमोरील समानता ही बाब न्यायपालिकेच्या अखत्यारीतील आहे. त्यांनी कोणताही दबाव न घेता न्यायाला सर्वोच्च स्थानी मानून कार्य करणे आवश्यक आहे. एखादा गुन्हेगार सत्तारुढ पक्षाशी संबंधित असल्यास त्याच्या भागातील पक्षप्रमुख न्यायाधीशांना सांगू लागला की, तो आमच्या पक्षाचा असल्यामुळे त्याच्यावर खटला भरणे उचित नाही. याउपर आपण आमच्या सांगण्याप्रमाणे वागला नाहीत, तर हे प्रकरण मंत्रीमहोदयांकडे नेऊन आम्ही आपली बदली करू. असे घडू लागले तर मोठी अनागोंदी आणि अन्याय शासनात निर्माण होईल. अशा नाशपद्धतीला (स्पॉईल सिस्टीम) आपण लोकशाहीत थारा देता कामा नये. नाशपद्धती म्हणजे एखादा पक्ष सत्तेवर आल्यानंतर त्याच्या पूर्वसुरी सत्ताधारी पक्षाने नेमलेल्या कर्मचाऱ्यांना, कारकून आणि शिपाई यांच्यासह सर्वांना कामावरुन काढून टाकणे आणि त्यांच्या ठिकाणी त्या नवीन पक्षाला सत्तेवर येण्यासाठी ज्यांनी मदत केली, अशा लोकांची नेमणूक करणे. सत्ताधारी पक्षाने त्या पक्षाच्या सदस्यांच्या फायद्यासाठी प्रशासन न राबविता प्रशासनात समानतेची, समन्यायी वागणूक ही बाब लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे.

सांविधानिक नैतिकता: बाबासाहेब लोकशाहीच्या बाबतीत सांविधानिक नैतिकतेला फार मोलाचे स्थान देतात. हा मुद्दा स्पष्ट करताना ते सांगतात की, ज्यांना भारतीय संविधान नष्ट करून त्याचा नवीन मसुदा करावासा वाटतो, अशा लोकांमध्ये सामील होण्यास माझी खरोखरीच तयारी आहे. परंतु आपण हे विसरतो की, आपले संविधान म्हणजे दुसरेतिसरे काही नसून वैध तरतुदींचा समावेश असलेला तो केवळ सांगाडा आहे. या सांगाड्याचे मांस, आपण ज्याला सांविधानिक नैतिकता म्हणतो, त्यामध्ये आहे. यालाच इंग्लंडमध्ये संविधानाचे संकेत म्हणतात. आणि लोकांनी त्या संकेतांचे पालन केलेच पाहिजे. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचे उदाहरण देऊन बाबासाहेब हा मुद्दा स्पष्ट करतात. वॉशिंग्टन यांची पहिली टर्म संपल्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढविण्यास नकार दिला. वास्तविक ते दहा वेळा उभारले असते, तरी तितक्या वेळा लोकांनी त्यांना निवडून दिले असते. मात्र, त्यांनी लोकांना संविधानाची आठवण करून दिली. आपल्याला अनुवांशिक राजा किंवा हुकूमशहा नको आहे. तुम्ही माझी पूजा करू लागलात, तर आपल्या तत्त्वप्रणालीचे काय?, असा प्रश्न त्याने उपस्थित केला. तरीही लोकाग्रहास्तव ते दुसऱ्यांना अध्यक्ष झाले. तिसऱ्यांदा मात्र त्यांनी लोकांना झिडकारले. हे सांविधानिक नैतिकतेचे उदाहरण आहे. सत्ताधाऱ्यांनी त्याचे पालन करणे हे लोकशाहीच्या हिताचे आहे.

अल्पमताचा सन्मान: लोकशाहीच्या नावावर बहुमतवाल्यांनी अल्पमतवाल्यांवर जुलूम करता कामा नये. बहुमतवाले जरी सत्तेवर असले तरी अल्पमतवाल्यांना स्वतःबद्दल सुरक्षितता वाटली पाहिजे. अल्पमतवाल्यांची मुस्कटदाबी केली जाते किंवा त्यांना डावपेचाने मार दिला जातो आहे, अशी अल्पमतवाल्यांची भावना होता कामा नये. अल्पमतवाल्या पक्षाने मांडलेल्या प्रस्तावास सत्ताधारी पक्षाने नेहमीच विरोध केला तर अल्पमतात असलेल्या सदस्यांना त्यांची गाऱ्हाणी मांडण्याची संधी मिळणार नाही. याचा परिणाम असा होईल की, अल्पमतातील लोकांमध्ये बेसनदशीर क्रांतीची वृत्ती बळावते. त्यामुळे लोकशाहीप्रमाणे ज्यावेळी कामकाज चाललेले असते आणि ज्या बहुमतांतील लोकांवर ती अवलंबून असते, त्यावेळेस बहुमतातील लोकांनी जुलमी पद्धतीने वागता कामा नये, असे बाबासाहेबांनी सांगून ठेवले आहे.

नैतिक अधिष्ठान: समाजातील नैतिक अधिष्ठान कार्यशील ठेवणे लोकशाहीला अत्यावश्यक आहे. नितीशास्त्र हे राजकारणापासून अलिप्त अथवा भिन्न असू शकत नाही. लोकशाहीच्या संबंधाने मुक्त शासन असे संबोधले जाते. मुक्त शासन म्हणजे समाज जीवनाच्या भव्य दृष्टीकोनातून लोकांना कायद्याच्या हस्तक्षेपाशिवाय प्रगतीसाठी मोकळे सोडणे होय. किंवा जर कायदाच करावयाचा असेल तर, कायदा करणाऱ्याला अशी खात्री पाहिजे की, कायदा यशस्वी होण्यासाठी समाजामध्ये पुरेसे नैतिक अधिष्ठान आहे. नैतिक सुस्थिती नसल्यास लोकशाहीचे तुकडे तुकडे होण्यास वेळ लागणार नाही, असा इशारा बाबासाहेब देतात.

लोकनिष्ठा: लोकशाहीला लोकनिष्ठेची फार गरज असते, असे बाबासाहेब सांगतात. लोकनिष्ठा म्हणजे सर्व अन्यायाच्या विरोधात आंदोलनासाठी उभी राहणारी कर्तव्यनिष्ठा. कोणावर अन्याय होतो आहे, ही गोष्ट गौण आहे. प्रत्येकाने, मग तो त्या विशिष्ट अन्यायाखाली भरडलेला असो अगर नसो, अन्यायाखाली भरडल्या जाणाऱ्या माणसाच्या मुक्तीसाठी मदत करण्याची तयारी केली पाहिजे. जर अन्यायाखाली चिरडल्या गेलेल्यांना अन्यायाचे निवारण करण्यासाठी इतरांपासून मदत झाली नाही, तर अशा वेळी लोकशाही धोक्यात आणणारी बंडाची वृत्ती त्यांच्यात बळावल्याशिवाय राहणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाहीचा विचार असा साकल्याने मांडताना दिसतात. लोकशाहीचे रोपटे सर्वच ठिकाणी वाढत नाही. आपल्याला त्याची सदोदित जोपासना करीत राहावे लागते. लोकशाहीच्या मूल्यांची सातत्याने तपासणी आणि राखण करावी लागते, तेव्हा कुठे ती कार्यान्वित राहते. लोकशाहीस पोषक अशा संविधानाचेही पोषण करीत राहावे लागणार आहे. पंचवार्षिक निवडणुकांतून मतदान हे आणि एवढेच आपले कर्तव्य नाही, तर सजग नागरिकाची भूमिका लोकशाही जोपासनेत आणि संवर्धनात महत्त्वाची असते. लोकशाहीमध्ये मतदान हे तर महत्त्वाचेच; मात्र, एक व्यक्ती, एक मत इथवरच अद्याप आपला प्रवास येऊन ठाकला आहे. येथून पुढचा बाबासाहेबांना अभिप्रेत एक व्यक्ती, एक मूल्य हा सांविधानिक मूल्यांपर्यंतचा प्रवास अद्याप बाकी आहे. तो पूर्ण करणे म्हणजेच देशातील समाजव्यवस्था संसदीय लोकशाहीप्रणालीशी सुसंगत करणे आणि बाबासाहेबांचे उपरोक्त मुलाखतीमधील विधान खोडून काढून त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करणे होय.



शनिवार, १३ एप्रिल, २०२४

पाकशास्त्रनिपुण डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आजवर त्यांच्या अलक्षित अशा पाककलानिपुणतेच्या कौशल्याबद्दल या विशेष लेखामध्ये माहिती देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खानपानविषयक विशेष आवडीनिवडींचीही या लेखात चर्चा करण्यात आली आहे. मात्र, त्यावरुन कोणी त्यांच्याविषयी गैरसमज करून घेण्याचे कारण नाही. बाबासाहेबांना आपल्या समाजबांधवांच्या दैन्यावस्थेची पूर्णपणे जाणीव होती. त्यामुळे त्यांच्यामध्ये असताना अगर इतरवेळीही त्यांनी खाण्यापिण्याची कधीही मौज केली नाही. किंबहुना, भाजीभाकरी, चटणीभाकर हे त्यांचे आवडीचे पदार्थ होते. ते आपल्या समाजबांधवांसमवेत, सहकाऱ्यांसमवेत आनंदाने त्यांच्यात बसून ते खात असत. हा लेख म्हणजे त्यांच्या पाककलाविषयक कौशल्यावर प्रकाशझोत टाकण्याचा केवळ प्रयत्नमात्र आहे.- डॉ. आलोक जत्राटकर)



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात अस्पृश्यतेचे चटके सोसले आणि त्यासोबत येणारे सारे दैन्य, अपेष्टा त्यांच्या वाट्यालाही आल्या. या सर्व विपरितावर मात करीत त्यातून त्यांनी आपल्या जीवनाची, कारकीर्दीची वाट प्रशस्त केली. अष्टपैलू व्यक्तीमत्त्वाचे ते धनी होत. आयुष्यामध्ये असा कोणताही विषय नसेल ज्याचे ज्ञान त्यांनी प्राप्त केले नाही. पाककला हा विषय सुद्धा त्यांनी वर्ज्य मानला नाही, तर त्याचेही ज्ञान त्यांना होते. त्यांच्या संग्रहात जगभरातील पाककलेवरील पुस्तके तर होतीच, मात्र, त्यापुढे जाऊन स्वतः उत्तम स्वयंपाक करण्यापर्यंत त्यांनी ही कला आत्मसात केलेली होती. इतकेच नव्हे, तर जेव्हाही कधी वेळ मिळेल, तेव्हा स्वतःच्या हाताने बनवून इतरांना खिलवण्याचा आनंदही ते घेत असत. एक समाधान त्यातून त्यांना लाभत असे.

खरे तर विद्यार्थीदशेमध्ये बाबासाहेबांनी अस्पृश्यता आणि गरीबी पराकोटीची पाहिली, सोसली. मात्र, वडील रामजी सकपाळ यांच्या प्रेरणेतून अभ्यासाच्या बाबतीत अजिबात कुचराई केली नाही. प्रसंगी पोटाला चिमटा काढून त्यांनी आपले लक्ष्य शिक्षणावर केंद्रित केले. मॅट्रीक उत्तीर्ण झाल्यानंतर केळुस्कर गुरूजींच्या मध्यस्थीने बाबासाहेबांना उच्चशिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांनी दरमहा २५ रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यामुळे ३ जानेवारी १९०८ रोजी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रिव्हियसच्या वर्गात प्रवेश घेतला. स्कॉलरशीपमुळे वाढलेल्या जबाबदारीची जाणीव बाळगून भीमराव शिकत होते. त्याच वेळी त्यांचे पर्शियनचे शिक्षक कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून रुजू झालेले होते. त्यांनी आपली खोली बाबासाहेबांना अभ्यासासाठी दिलेली होती. या खोलीत बाबासाहेब सकाळी सातला येऊन अभ्यासाला बसत. कोर्टात काम करण्यासाठी डबक चाळीच्या आसपासचा एक गृहस्थ ९ वाजता घरून निघत असे. बाबासाहेबांसाठी घरचे लोक त्याच्यासोबत जेवण पाठवित असत. हे जेवण म्हणजे बाजरीच्या दोन भाकरी आणि बोंबलाची चटणी असे. तो गृहस्थ बाबासाहेबांना जेवण देऊन पुढे आपल्या कामाला जाई. दहाच्या आसपास बाबासाहेब जेवण घेत आणि दीड वाजता वर्गात जाऊन बसत. दोनेक वर्षे असाच नित्यक्रम चालला.

विद्यार्थीदशेत गरजेच्या वेळी पोट भरण्यासाठी उपयोगी पडलेल्या बोंबलाच्या चटणीविषयी बाबासाहेबांच्या मनात खूप प्रेम होते. हा पदार्थ पुढे आयुष्यभर त्यांच्या आवडत्या पदार्थांमध्ये उच्च स्थानी राहिला. बाबासाहेबांच्या खाद्यसवयींच्या बद्दल माईसाहेबांनी त्यांच्या चरित्रात काही नोंदी केल्या आहेत. बाबासाहेब इंग्लंड, अमेरिकेत राहिल्याने तेथील काही आवडलेल्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या होत्या. त्यांना बेड टी घेण्याची सवय होती. चहा घेता घेता ते सकाळची वर्तमानपत्रे चाळत असत. चहा पिऊन झाल्यानंतर ते योगासने, व्यायाम करीत. रक्ताभिसरण व मज्जातंतूंना तरतरीसाठी मॉलिश करवून घेत. आंघोळ आटोपून ते साडेआठ, नऊच्या सुमारास न्याहरीसाठी टेबलवर उपस्थित राहात. ताजे आणि गरम-गरम पदार्थ त्यांना आवडत असत.

बाबासाहेबांच्या न्याहरीत पहिला पॉरिज कोर्स असे. पॉरिज म्हणजे उकळलेले ओट्स. या उकळलेल्या ओट्स दुधात चांगल्या रितीने मिसळला की पॉरिज कोर्स तयार होत असे. आपल्या पेज किंवा कांजीसारखाच हा पदार्थ. कधी कधी बाबासाहेब कॉर्न फ्लेक्सही घेत. अंड्याचे विविध पदार्थही त्यांना न्याहरीला आवडत. बॉईल्ड एग, हाफ फ्राय, ऑम्लेट, भुर्जी, स्क्रॅम्बल्ड एग असे पदार्थ माईसाहेब त्यांना आलटून पालटून देत. अंड्यासोबत ते गरम टोस्ट बटर लावून घेत. निरनिराळ्या प्रकारचे जॅम त्यांना आवडत. अंडी-टोस्ट झाल्यावर ते कॉफी घेत. सकाळची न्याहरी हाच त्यांचा मुख्य आहार असल्याप्रमाणे होता. दुपारी ते जास्त जेवत नसत.

बाबासाहेबांना क्रॉकरीचीही फार आवड होती. नाश्त्यासाठी, चहासाठी, कॉफीसाठी, जेवणासाठी अशा निरनिराळ्या क्रॉकरीचे सेट त्यांनी आणवले होते. ज्या त्या गोष्टीसाठी, ज्या त्या प्रकारची क्रॉकरी वापरली पाहिजे, असा त्यांचा दंडक होता. निरनिराळ्या प्रसंगी निरनिराळी क्रॉकरी ते वापरायला सांगत. 

बाबासाहेबांचे दुपारचे जेवण खूपच कमी असे. गव्हाच्या पिठाचे दोन लहान फुलके आणि थोडासा भात ते खात. जेवणात त्यांना मांसाहार आवडे. ते अगदीच थोडं खात, पण पदार्थांत त्यांना विविधता आवडे. मटणाच्या प्रकारांत रोस्ट मटण त्यांना विशेष आवडे. पाश्चिमात्य पद्धतीने तयार केलेले खाद्यपदार्थ त्यांना अधिक आवडत. रोस्ट मटण, कोल्ड मटण, विशेष पद्धतीचे सूप, पुडिंग्ज, बेक्ड पदार्थ त्यांना आवडत. कलकत्त्याची हिलसा मासळी त्यांना फार आवडे. डी.जी. जाधव हे त्यावेळी कलकत्त्याला मजूर आयुक्त होते. त्यांच्याकडून ते बर्फात घालून हिसला फिश विमानाने पार्सलने मागवत असत. कोळंबी फ्राय आणि तळलेले पॉपलेटही त्यांना आवडत. कोंबडीच्या मटणाचे चिकन फ्राय, चिकन करी, तंदुरी चिकन असे प्रकारही ते आवडीने खात. जेवणात मांसाहारी पदार्थ लागत असला तरी एक ते दोन तुकडेच ते घेत असत. दिवसभराचे काम आटोपून थकल्यानंतर रात्री मात्र मोजकेच अन्न घेऊन ते पुन्हा उशीरापर्यंत वाचन, लेखन करीत बसत.

बाबासाहेबांची ही आवड केवळ खाण्यापुरतीच मर्यादित होती, असे मात्र नाही. ते स्वतः उत्तम स्वयंपाक करीत असल्याची उदाहरणं खुद्द माईसाहेब आणि बळवंतराव वराळे यांनी आपापल्या आठवणींमध्ये दिली आहेत. बळवंतराव १९५०मध्ये बाबासाहेबांना भेटायला प्रथमच दिल्लीला आले. त्यावेळी बाबासाहेब वेळात वेळ काढून त्यांना दिल्ली आणि परिसराची सैर घडवित. एकदा त्यांनी ओखला येथे सहलीसाठी जाण्याचा कार्यक्रम आखला. दिल्लीपासून सात किलोमीटरवर असलेल्या ओखला इथं यमुना नदीला बंधारा घालून आधुनिक पद्धतीचे उद्यान तयार केले होते. तिथे एक सरकारी गेस्ट हाऊस होते. तिकडे जायचे ठरले. सोबत बाबासाहेबांचे पर्सनल सेक्रेटरी मेसी आणि त्यांच्या पत्नी, असिस्टंट सेक्रेटरी पिल्ले, डॉ. मालवणकर, बाबासाहेबांचे एक नामवंत पत्रकार मित्र श्रीकृष्ण आणि माईसाहेब अशी मंडळी होती. स्वयंपाकाचे साहित्यही सोबत घेण्यात आले होते.

ओखल्याला पोहोचल्यानंतर सर्वांनी चहा घेतला आणि स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. त्यावेळी स्वतःच स्वयंपाक करण्याचा बाबासाहेबांनी आग्रह धरला आणि स्वयंपाकाची सूत्रे आपल्या ताब्यात घेतली. सोबत आणलेल्या दोन्ही शेगड्या आणि साहित्य जवळ घेतले. कोंबडीसाठी, बिर्याणीसाठी, सुक्या मटणासाठी वेगवेगळा मसाला वाटायच्या सूचना नोकरांना केल्या. ‘मसाला इतका बारीक आणि लोण्यासारखा मऊशार व्हायला हवा की डोळ्यात घातला तरी जाणवायला नको,’ असं त्यांनी माईसाहेबांना सांगितलं. सगळा स्वयंपाक हळूहळू त्यांनी तयार करवून घेतला. कोंबडीचे कालवण, सुके मटण, बिर्याणी, वांगी-बटाट्याची भाजी असे पदार्थ त्यांनी तयार केले. कालवण तयार होत असताना बाबासाहेब स्वतःच्या हातात चिमटा घेऊन भांड्यावरील झाकण वरचे वर उघडत असत. चमच्याने कालवण आपल्य. तळहातावर घेऊन जिभेने ते चाटून बघत. त्याप्रमाणे त्या कालवणात काय हवे-नको ते पाहात. त्या वेळी स्वयंपाक करीत असतानाचे बाबासाहेबांचे ते चित्र पाहण्यासारखे होते, असं बळवंतराव लिहीतात. कालवणात मीठ, मिरची, हळद, जिरे, खोबरे, आले असे सर्व पदार्थ त्यांनी अगदी प्रमाणात घातले. कालवण बरोबर झाले आहे किंवा नाही, हे बळवंतरावांनाही पाहण्यास ते सांगत. “चांगला स्वादिष्ट स्वयंपाक तयार करणे ही देखील एक कलाच आहे. ती लहानपणापासून मला अवगत आहे. माझी आई वारल्यानंतर आम्ही आमच्या आत्येला, बहिणीला स्वयंपाकात मदत करीत असू. म्हणूनच मला ही कला अवगत झाली आहे. स्वतःचा संवयंपाक स्वतः करणे यात कोणत्याही प्रकारचा कमीपणा नाही,” असं त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं. 

यावेळी तोंडी लावण्यासाठी ओल्या मिरच्या आणि खोबऱ्याची चटणीही त्यांनी वाटून घेतली. मदत करण्यास उत्सुक असलेल्या माईसाहेबांना देखील त्यांनी कशालाही हात लावू दिला नाही. उलट, “पाहा, तुम्हा स्त्रियांना देखील असा स्वयंपाक करता येईल का, अशी शंका वाटते,” असं माईसाहेबांना चिडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी सर्वांनीच जेवत असताना बाबासाहेबांच्या पाककलेची मनापासून तारीफ केली. बाबासाहेबांचे पत्रकार मित्र श्रीकृष्ण तर आश्चर्यचकितच झाले. “तुमच्या हातचा स्वयंपाक जेवल्याने मी आज खरोखरीच धन्य झालो,” असे उद्गार त्यांनी काढले. इतरांच्या मनात देखील बाबासाहेबांविषयी तीच भावना जागली होती.

स्वतः स्वयंपाक करून इतरांना जेवू घालण्यात बाबासाहेबांना एक प्रकारचा विलक्षण आनंद मिळत असे. केवळ बळवंतरावांनाच नव्हे, तर त्यांचे सुपुत्र भालचंद्र यांनाही त्यांनी आपल्या हातचे जेवण खाऊ घातले. त्याचा किस्सा स्वतः भालचंद्र वराळे यांनीच कथन केला आहे. बळवंतराव आणि भालचंद्र हे औरंमगाबादेत छावणी येथे राहात असताना बाबासाहेब काहीच अंतरावरील कुकरी हाऊसमध्ये राहात होते. कॉलेजचा आणि झोपण्याचा वेळ सोडला तर भालचंद्र इतर वेळी बाबासाहेबांजवळच असत. त्यांच्यासोबतच जेवत. त्यावेळी बाबासाहेबांच्या असे लक्षात आले की, भालचंद्र यांना मांसाहार आवडत नाही. तेव्हा त्यांना गोड पदार्थ आवडत असावेत, असा कयास बाबासाहेबांनी लावला. तो बरोबर होता. तेव्हा भालचंद्रना ते म्हणाले, “येत्या रविवारी मी तुला स्वतः खीर करून खायला देईन.” त्यावेळी बाबासाहेब नुकतेच रंगूनला जागतिक बौद्ध परिषदेसाठी जाऊन आले होते. तेथे त्यांच्या सन्मानार्थ आयोजित केलेल्या खास भोजन समारंभात ब्रह्मदेशाची खास अशी गोड खीर होती. ती त्यांना खूपच आवडल्याने ती कोणत्या पद्धतीने केली, त्यात काय काय घातले, याची बाबासाहेबांनी माहिती घेतली. तशीच खीर करण्याचे त्यांनी ठरविले. त्यानुसार रविवारी आवरुन सकाळी सकाळीच ते स्वयंपाकघरात दाखल झाले. दूधवाल्याकडून दोन शेर दूध जादाचे घेतले होते. नोकर सुदामाला बाहेर काढून स्वतः बाबासाहेब एका फोल्डींग खुर्चीवर हाफ शर्ट व लुंगी गुंडाळून बसले होते. समोर शेगडीवर दुधाचे पातेले, आजूबाजूला साखर, किसमिस, काजू आणि इतर अनेक पदार्थ होते. बाबासाहेब हातातल्या पळीने दूध हलवित होते.  भालचंद्रना पाहून म्हणाले, ‘अरे आलास. ये. पाहा तुझ्यासाठी मी खीर करीत आहे.’ बाबासाहेबांसारखा महापुरूष आपल्यासाठी खीर करीत असल्याचे पाहून भालचंद्र ओशाळल्यागत झाले. ते म्हणाले, “बाबा, आपण निष्कारण त्रास करून घेताहात. आपण स्वतः हे करण्याऐवजी सुदामाला सांगितले असते, तर त्याने केले असते.” त्यावर बाबासाहेब म्हणाले, “अरे, मला तुला ही खीर करून खाऊ घालायची होती. तेव्हा मी सुदामाला कशाला सांगेन?” त्यानंतर बाबासाहेबांनी माईसाहेबांसह सर्वांना ही खीर खाऊ घातली. ती खीर प्रमाणापेक्षा अधिक गोड झाली होती, मात्र साक्षात बाबासाहेबांनी त्यांच्यासाठी केलेली असल्याने भालचंद्रनी दोन वाट्या खीर खाल्ली.

ज्या विषयाला हात घालावयाचे, त्यात प्रावीण्य मिळवायचे, अशा प्रकारचा विद्यार्थीबाणा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये होता. पाककलेसारख्या कौशल्याधिष्ठित शास्त्रामध्येही त्यांनी असे प्रयोगशील नैपुण्य प्राप्त केले होते. जेव्हा कधी वेळ मिळेल, त्या वेळी आपले आप्तजन, मित्र परिवार यांना विविध प्रकारचे पदार्थ करून घालण्यामध्ये त्यांना आगळे समाधान लाभत असे. या महामानवाचे वेगळेपण अधोरेखित करणारी ही बाब आहे.


आंबेडकरी शिक्षणाचा परिप्रेक्ष



प्रा. डॉ. गिरीश मोरे हे नाव आंबेडकरी चळवळीला शैक्षणिक आणि नैतिक अधिष्ठान प्रदान करणाऱ्या काही मोजक्या नावांपैकी एक होय. अत्यंत संयत आणि संतुलित व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या डॉ. मोरे यांनी अभिव्यक्तीही त्याच प्रकारची आहे. त्यांच्या लेखनात आणि भाषणात नेहमीच सर्वसमावेशकता असते. आंबेडकरी चळवळ म्हणजे केवळ व्यवस्थेला नकार नसून, नकार देणाऱ्यांच्या आचार-विचार प्रणालीमध्ये ससंदर्भ परिवर्तन घडवून त्याचे स्वीकारात रुपांतर घडविण्याची एक महत्त्वाची कार्यशैली आहे. या कार्यशैलीचे अवलंबन करणारे डॉ. मोरे यांचे ‘आंबेडकरी शिक्षणाचा परिप्रेक्ष’ हे एक महत्त्वाचे पुस्तक आज (दि. १३ एप्रिल) प्रकाशित होते आहे. त्या निमित्ताने...



डॉ. आंबेडकर ज्या मानवतावादी मूल्यांची प्रस्थापना करण्यासाठी झगडत होते, त्या मूल्यांचा स्वीकार हा शिक्षणातून माणसात निर्माण होणाऱ्या विवेकातूनच सहजशक्य होते. त्यामुळे बाबासाहेबांनी व्यक्तीगत तसेच सार्वजनिक स्तरावर सदैव शिक्षणाची कास धरली. व्यापक लोकशिक्षणासाठी ते आग्रही राहिले. बाबासाहेबांच्या या शैक्षणिक कार्याचा साकल्याने वेध घेण्याचा प्रयत्न डॉ. गिरीश मोरे यांनी सदर पुस्तकामध्ये घेतलेला आहे. 

डॉ. सुनीलकुमार लवटे यांची अतिशय अभ्यासपूर्ण आणि वाचनीय प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणव्यवहाराकडून  केलेली अपेक्षा आणि पाहिलेली स्वप्ने डॉ. मोरे यांनी या पुस्तकात सुमगतेने मांडले असल्याचे त्यांनी यात म्हटले आहे. त्यात स्वाभिमान, नैतिकता (शील), प्रज्ञा, मानवमुक्ती, वैज्ञानिक दृष्टीकोन, डोळसपणा, धर्मनिरपेक्षता, समता, योग्यता, स्वातंत्र्य आणि सन्मान ही उद्दिष्टे अतर्भूत आहेत. वैश्विक उदारमतवादी समाजनिर्मितीची आंबेडकरी शिक्षणाची धारणा अधोरेखित करण्याचे काम या पुस्तकाच्या माध्यमातून डॉ. मोरे यांनी केल्याचे डॉ. लवटे यांनी म्हटले आहे.

आंबेडकरी शिक्षणाची परंपरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक जीवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वाचन आणि पुस्तकप्रेम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संशोधन व लेखन, शिक्षण कशासाठी घ्यायचे?, प्राथमिक आणि उच्च शिक्षण कशासाठी?, विद्यार्थी कसा असावा?, शिक्षक व प्राध्यापक कसा असावा?, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षणविषयक कार्य आणि आंबेडकरी शिक्षणाची पायाभूत तत्त्वे अशा एकूण ११ प्रकरणांमध्ये डॉ. मोरे यांनी आपल्या पुस्तकाची मांडणी केली आहे. त्यामधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत शैक्षणिक संकल्पनेविषयीचा काहीएक आवाका वाचकाला आल्याखेरीज राहात नाही. डॉ. मोरे यांची समजावून सांगण्याची हातोटी ही अत्यंत सोपी, सहज आणि ओघवती असल्याने सर्व स्तरांतील वाचकासाठी ते समजणे सोपे होते. 

शिक्षण ही मानवाची प्राथमिक गरज असून त्या शिक्षणाने त्याच्यामध्ये आत्मप्रतिषेठेची भावना निर्माण झाली पाहिजे. शिक्षण ही ऐतखाऊ लोकांची सेय नव्हे, तर गरजवंतांची गरज बनली पाहिजे. त्यासाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण आवश्यक आहे. शिक्षण म्हणजे केवळ साक्षरता नव्हे, तर त्यातून माणसात योग्यता निर्माण झाली पाहिजे, तो सन्मानास पात्र ठरला पाहिजे. शिक्षण हे मानवमुक्तीचे साधन असून शिक्षणामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन प्राप्त होऊन, व्यापक सामाजिक डोळसपणा निर्माण व्हायला हवा. सर्वव्यापी शिक्षण हे जितके आवश्यक त्याहून त्या शिक्षणाने माणसात शील निर्माण व्हायला हवे. तसे करण्यास अपयशी ठरणारे शिक्षण हे खरे शिक्षणच नव्हे. या आणि अशा अनेक आंबेडकरी शैक्षणिक संकल्पनेतील मूल्यांचा उद्घोष आणि अधोरेखन डॉ. गिरीश मोरे यांनी या पुस्तकामध्ये केलेले आहे. 

मला वाचक म्हणून यातील सर्वप्रथम जी बाब भावली, ती म्हणजे डॉ. मोरे यांनी आपल्या संशोधक विद्यार्थ्यांना हे पुस्तक अर्पण केले आहे. हे विद्यार्थी सुद्धा आजघडीला स्वतंत्र शिक्षक, संशोधक म्हणून लौकिक मिळवून आहेत. आपल्याला प्रश्न विचारुन सातत्याने विचारप्रवण राखणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळेच हे लेखन हातून साकारू शकले, अशी प्रांजळभावना व्यक्त करून लेखन पूर्ण झाल्यानंतर त्याची कृतज्ञ जाणीव ठेवून त्या विद्यार्थ्यांनाच लेखन अर्पण करणारा असा संशोधक-शिक्षक समकाळात दुर्मिळच. म्हणूनच अशा एका सद्भावना जपून सामाजिक दिग्दर्शन करणाऱ्या शिक्षकाच्या या पुस्तकाचे स्वागत आवश्यकच!

आंबेडकरी शिक्षणाचा परिप्रेक्ष

लेखक: डॉ. गिरीश मोरे

निर्मिती प्रकाशन, कोल्हापूर

पृष्ठे ११२

किंमत रु. १४०/-


बुधवार, १० एप्रिल, २०२४

काय नवाल इपईलं... लोकसाहित्याचं संचित

 



आपल्या भावी पिढ्या स्मार्ट- अगदी ओव्हरस्मार्ट म्हणाव्यात अशा असल्याचं दिसताहेत... पण, आपल्या मागील पिढ्या ह्या सर्जनशील अधिक, आणि या दोहोंना जोडणारा दुवा म्हणजे वर्तमान पिढी. प्रा. अशोक चोकाककर यांनी त्यांच्या मातोश्री पार्वती कृष्णा चोकाककर यांच्या मौखिक परंपरेतील गद्यपद्याचं केलेलं शब्दांकन नुकतंच वाचून संपवलं. काय नवाल इपईलं असं या पुस्तकाचं नाव. आपल्या लोकसाहित्याच्या परंपरेमध्ये प्रा. चोकाककर यांनी या पुस्तकाच्या रुपानं फार मोलाची भर घातलेली आहे. आपल्या आईच्या प्रत्येक शब्दाचं शब्दांकन करावं, त्याचं जतन करावं आणि ते भावी पिढ्यांना सुपूर्द करावं, या भावनेतून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला. आईनंही सहकार्य केलं, पण ध्यानीमनी नसताना आईचं निधन झालं. त्यामुळं बरंचसं असं लिहून घ्यायचं राहून गेलेलं आहे; मात्र, जितकंही शब्दसंचित हाती लागलेलं आहे, ते सारं या पुस्तकाच्या रुपानं चोकाककर यांनी साकार केलेलं आहे. आईचा हा ठेवा त्यांनी तिलाच अर्पण करणं स्वाभाविकच आहे.

तसं पाहता हे पुस्तक म्हणजे कृतज्ञताभावाचं मूर्तीमंत प्रतीक आहे. म्हणजे प्रा. चोकाककर यांची त्यांच्या आई आणि एकूणच पूर्वजांप्रतीची कृतज्ञता आहे आणि त्या कृतज्ञतेला त्यांच्या आईंच्या कृतज्ञताशब्दांचं अधिष्ठान आहे. या कृतज्ञताभावाची सुरवात पहिल्या कवितेपासूनच होते.

एवढा माझा पिंड

माझ्या बयाच्या डाव्या कुशी

माझ्या जल्मादिशी

बया येळाची उपाशी

माझ्या त्या बयाला

मागं परतून बोलू कशी

आम्हाला जन्म दिला, पोसलं म्हणजे काय उपकार केले का, असा भाव आईबापाप्रती आजच्या पिढीमध्ये दिसतो. त्या पार्श्वभूमीवर आपल्याला जन्म देताना आई उपाशी होती, तशा अवस्थेत तिनं आपल्याला जन्म दिला, याची कृतज्ञता कशी आणि कोणत्या शब्दांत तिच्याकडं व्यक्त करावी, असं आईंना वाटतं. अशा कृतज्ञभावानं ओथंबलेल्या अनेक कविता इथं पानोपानी आहेत. आईबापासह माहेरच्या माणसांपासून ते अगदी नणंद-भावजया, सासू-सासरे यांच्याविषयीही तो ठिकठिकाणी प्रकट झाला आहे.

पिताजी माझा पिंपळ

बया माझी ती पिपरनं

दोघांच्या सावलीला

झॉप लागली सपरून

झाडामंदी झाडं

सावली बाबळ बाईयची

साऱ्या गोतामंधी

मया आगळी आईची

पिंपळ-पिंपरणीच्या सावलीच्या गारव्याची उपमा आई-बापाच्या प्रेमाला इथं देऊन त्याची महत्ता केवढी नेमकेपणानं त्या सांगतात.

विज्ञान, नवतंत्रज्ञान यांच्या सहाय्यानं गावामध्ये दाखल होणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंविषयी कुतूहलपूर्ण स्वागतशीलताही या काव्यातून डोकावते.

चोकाक गावामंदी

काय नवलं इपईलं

शिवा-अर्जुनानं हिरीवर

पाण्याला नवं इंजान जुपईलं

तोवर मोठ्या कष्टानं शेताला मोटेनं पाणी शेंदणाऱ्या आपल्या विहीरीवर आता ते काम रस्टन कंपनीचं नवं इंजिन कसं करतंय, याचं मोठं अप्रूप आईंना वाटतं आणि तेच या चार ओळींतून झळकतं. इपईलं म्हणजे घडलं.

नातेसंबंध सांभाळताना, कष्टताना या पिढीनं अनेक वेदनेचे प्रसंगही सोसले, पाहिले, त्यालाही इथं शब्दरुप आपसूक आलं आहे.

किसन पार्वतीनं

रगात आटवून

हाडं समदी झिजवूनं

केलं लेकांना सरदारं

त्ये आपल्या राण्यांनाच

घालत्यात ज्वार

उपसत्यात तलवार

जल्म दिल्याल्या आई-बा वर

करत्यात वरमी वार

एवढा अन्याय का झाला?

तर आई बापानं

जलमच का दिला?

समोरच्याच्या दुःखानंही आईंच्या हृदयाला पाझर फुटून त्यातून असे शब्द बाहेर पडताना दिसतात. कृषीसंस्कृतीचं दर्शन तर इथं पानोपानी होतंच, पण अगदी मृत्यूचं अपरिहार्यत्व आणि त्यातून उमगणारं जीवनाचं तत्त्वज्ञानही या काव्यातून सामोरं येताना दिसतं.

अशा जवळपास साठभर वेगवेगळ्या प्रकारच्या काव्यरचना यामध्ये आहेत. यात कवनं, ओव्या, पंचमीची गाणी, उखाणे, पाळणा अशांचा समावेश आहे.

हा लोकसाहित्यप्रवास केवळ काव्यरचनांपर्यंतच मर्यादित नाही, तर लोककथा आणि स्वकथनात्मक गद्यसाहित्यही इथं आहे, हे एक वेगळेपण इथं दिसतं. चिमणी पडी खिरी, चिमणा काय करी?, करणी तशी भरणी या लोककथांच्या माध्यमातून त्या सदुपदेश करतात. करणी तशी भरणी वाचताना, कशी गंमत झाली एका दुष्ट बाईची- जी आपल्या नवऱ्यालाच त्याच्या आईला पुरात टाकून द्यायला सांगते.

दळाप दळतुया घरात गं, सासू माझी पुरात गं

असा विकृत आनंद व्यक्त करणाऱ्या या सुनेला तिचा नवरा जेव्हा

गाडी बैलं दारात गं, पट्ट्याची आई घरात गं

असं उत्तर देतो, तेव्हा आपल्यालाही त्यातलं मर्म उमगून वाचकाला त्यात मौज वाटून तो त्यात रमल्याशिवाय राहात नाही. आणि आपसूकच काय घ्यायचा तो बोध तो घेतो. मोहना, कुस्ती परंपरा, एका आतड्याचं दोन तुकडं, उतमा पडला हिरीत, अशोकचा जन्म, किसनरावांचं कष्ट हे लेख म्हणजे चोकाककर घराण्याचा त्यांच्या पणजांपासूनचा इतिहासच आहे. पार्वतीबाईंनी या घरात सून म्हणून आल्यानंतर या घराण्याची इतकी माहिती मिळवली की, संचित म्हणून ती त्यांनी आता पुढील पिढ्यांना सुपूर्द केलीय. त्यांच्या या संचितामधूनच त्यांची पणजी मोहना हिच्या कष्टाळू वृत्ती आणि खमकेपणातूनच हे घराणं सुखसमाधानाचे, वैभवाचे दिवस पाहात असल्याचं त्या सांगतात. हा इतिहास अगदी आजपर्यंत आणून जोडतात. त्या काळातल्या माणसांचं चांगुलपण अधोरेखित करणाऱ्या गोष्टी त्या आवर्जून सांगतात. त्यांची कृतज्ञ दखल घेतात. आईंचे अनुभव हे कोरडे शब्दरुप घेऊन येत नाहीत, तर त्या भाषेला निरीक्षणांची जोड आहे, विशेषणांची पखरण आहे. त्यातून एक आगळंच सौष्ठव तिला प्राप्त झालेलं आहे. आज आपण तरी आपले अनुभव इतक्या रसाळ, ओघवत्या आणि वाचनीय पद्धतीनं सांगू शकू का, असा प्रश्न पडल्याविना राहात नाही. शब्दबंबाळतेला इथं थाराच नाही. जे आलंय ते थेट हृदयातून आणि अत्यंत नेमकेपणानं. त्यामुळं वाचकालाही हे भाषासौंदर्य भुरळ घातल्याशिवाय राहात नाही. आईच्या या आठवसंग्रहामध्ये मग चोकाककर सरांनी छायाचित्रं, आडनावाचा दस्तऐवज, हेळव्याचं पत्र, यादी वंशावळी, कुटुंबविस्तार, व्यक्तीविषयक टीपा आणि महत्त्वाचं म्हणजे शब्दार्थ सूची अशी पुस्तीही जोडलेली आहे. त्यातून या पुस्तकाला एक पूर्णत्व देण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे. मोग्गलान श्रावस्ती यांनी मुखपृष्ठासाठी आईंचं जे पेंटिंग केलेलं आहे, त्यातूनच त्यांचं एकूण कष्टातून आलेलं रापलेपण आणि सुख-समाधानाचं अस्तित्व त्यांचे डोळे आणि व्यक्तीत्वातून स्पष्ट होतं.  

या प्रसंगी बहिणाबाई आणि त्यांचे चिरंजीव सोपान यांची आठवण होणंही साहजिकच. चोकाककर सरांनी त्याचप्रमाणं आपल्या आईचं हे संचित समाजाकडं सुपूर्द केलंय. असे सोपान त्या काळात घरोघरी निर्माण झाले असते, तर भारतीय लोकपरंपरेतील लोकसाहित्याचं दालन हे आजच्या पेक्षा कितीतरी अधिक समृद्ध झाल्याचं पाहायला मिळालं असतं. त्या दृष्टीनं पार्वती चोकाककर यांच्या वाणीला शब्दरुप देऊन आपल्यापर्यंत पोहोचविणाऱ्या प्रा. अशोक चोकाककर यांच्या प्रयत्नांचं अनमोलत्व आपण लक्षात घ्यायला हवं.

पुस्तकाचं शीर्षक: काय नवाल इपईलं

पार्वती कृष्णा चोकाककर (शब्दांकन: प्रा. अशोक चोकाककर)

अत्तप्रज्ञ प्रकाशन, कोल्हापूर

पृष्ठे: १४४

किंमत: रु. २००/-