मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

...वो 'नजर' कहाँ से लाओगे?

गेले दोन दिवस (कालचा आणि आजचा) हे माझ्या फोटोग्राफीमधील आयुष्याच्या दृष्टीनं अतिशय (आनंदाचे आणि दुःखाचे) संमिश्र स्वरुपाचे ठरले.

काल दुपारी ज्येष्ठ एरियल फोटोग्राफर गोपाळ बोधे हे आमच्या कार्यालयात, मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचं निमंत्रण भुजबळ साहेबांना देण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांची भेट झाली, त्यांच्याशी चांगला संवाद झाला, ही आनंदाची घटना. त्यांच्या भेटीची बातमी रात्री उशीरापर्यंत माझ्या छायाचित्रकार मित्रांशी आणि छायाचित्रण कलेतील माझे गुरू शशिकांत मुळे यांच्याशी शेअर केली. आनंद द्विगुणित झाला.

आज सकाळी आवरुन ऑफिसला यायला घरातून बाहेर पडतो न् पडतो, तोच थेट भुजबळ साहेबांकडून अत्यंत दुःखद असा मेसेज आला ('चिंतन'च्याही आधी!)- ज्येष्ठ छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष गेल्याचा! विश्वास ठेवण्यासारखी बातमी नव्हतीच! मी स्टेशनवरूनच आणखी दोघा-तिघांना फोन करून बातमी कन्फर्म केली. साहेबांचा कन्डोलन्स मेसेज तयार करायलाही धीर गोळा करावा लागला. कालच्या आनंदावर आजचं दुःख भारी पडलं.

गोपाळ बोधे आणि गौतम राजाध्यक्ष हे दोघेही छायाचित्रणाच्या क्षेत्रातलेच असले तरी या क्षेत्रातल्या दोन भिन्न प्रकारच्या प्रांतात त्यांनी आपापलं प्रभुत्व सिद्ध केलेलं आहे. भारतातले पहिले एरियल फोटोग्राफर असलेल्या किंबहुना, ज्यांच्या प्रयत्नानं देशात एरियल फोटोग्राफी करण्यास परवानगी मिळाली, त्या गोपाळ बोधे यांचे आम्ही फोटोग्राफीचे विद्यार्थी सुरवातीपासूनचे फॅन होतो. गेटवे ऑफ इंडियाचे तीन 'डोम' आम्ही 'बेटर फोटोग्राफी'मध्ये त्यांच्याविषयीच्या आर्टिकलमध्ये पहिल्यांदा पाहिले. आणि अशीही काही फोटोग्राफी करता येऊ शकते, हे आम्हाला त्यावेळी पहिल्यांदा समजलं. बोधेंविषयी एक आदराचं स्थान हृदयात कायमचं निर्माण झालं.

आमची तीच अवस्था गौतम राजाध्यक्ष यांच्या बाबतीत सुद्धा झालेली असायची. वेगवेगळ्या ग्लॅमर मॅगेझिनमध्ये त्यांनी काढलेली छायाचित्र नुसती पाहात राहावीत, असं वाटायचं. यात त्या चेहऱ्याचा किती वाटा आणि छायाचित्रकाराचा किती, हे त्यावेळी समजत नव्हतं. आणि आज समजतंय की या दोन्ही गोष्टी परस्परांहून वेगळ्या जरी करता आल्या नाहीत, तरी सौंदर्य टिपणाऱ्या फोटोग्राफरच्या नजरेचं महत्त्वच अधिक आहे. गौतमजींनी नट-नट्यांची कितीतरी छायाचित्रं काढली, पण त्यात झळकणाऱ्या सौंदर्यावर त्यांनी कधीही अश्लीलतेची सावलीही पडू दिली नाही, हे त्यांच्या कॅमेऱ्यामागच्या नजरेचं मला जाणवलेलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य! गौतम राजाध्यक्षांची फोटो काढण्याची स्टाईल, त्यांचं लाइटिंग माझ्या एवढं परिचयाचं झालं की, एखादा फोटो पाहिला की, वाटतं, 'अरे, हा डेफिनिटली गौतम राजाध्यक्ष टच!' केसरी पाटील यांच्या 'प्रवास...एका प्रवासाचा...' या चरित्रात्मक पुस्तकाच्या कव्हरवर केसरी पाटलांचा फोटो पाहिला की जाणवतं, 'येस, इट्स गौतम!'

सन 2001मध्ये गौतम राजाध्यक्षांनी कोल्हापूरमध्ये 'चेहरे' या त्यांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. त्यावेळी आमचे पत्रकारितेतील उमेदवारीचे दिवस होते आणि मी 'निपाणी-दर्शन' हे स्थानिक केबल न्यूज चॅनल चालवायचो. त्यावर कोल्हापूरपासून बेळगावपर्यंतच्या आणि चिकोडीपासून ते गडहिंग्लज-गारगोटीपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या दाखवण्याचा माझा प्रयत्न असायचा. साहजिकच गौतम राजाध्यक्षांना भेटण्याची संधी मी दवडणार नव्हतो. मी कॅमेरा युनिटसह प्रदर्शनस्थळी पोहोचलो. गौतमजींनी नेहमीप्रमाणं एक सुंदरसा झब्बा आणि एका खांद्यावर व्यवस्थित घडी घातलेली शाल घेतली होती. त्याहून महत्वाचं म्हणजे त्यांचं ट्रेडमार्क स्माईल, जे कधीही त्यांच्या चेहऱ्यावरुन ढळलेलं दिसलं नाही. मी आधी प्रदर्शनाचं मिळेल तेवढं फुटेज कॅमेरामनला घ्यायला सांगितलं आणि त्यानंतर गौतमजींचा इंटरव्ह्यू घेतला. 'चेहरे'पासून ते त्यांचं करिअर आणि एकूणच करिअरग्राफ असं या इंटरव्ह्यूचं स्वरुप होतं. त्यांना त्यावेळी मी त्यांच्या फोटोग्राफीतल्या यशाचं रहस्य काय, असा सरधोपट आणि बाळबोध प्रश्न विचारला होता. त्यांनी मात्र तसं न समजता मला दिलेलं उत्तर आजही जसंच्या तसं मला लक्षात आहे. गौतमजी म्हणाले होते,

'मी कधीही समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा फोटो काढत नाही. तर मला त्याचं व्यक्तिमत्त्व माझ्या छायाचित्राच्या माध्यमातून रेखाटायचं असतं. त्यामुळं माझ्याकडं कोणी फोटो काढायला आला तर मी 'बसवा समोर आणि काढा फोटो', असं कधीही करत नाही. त्या व्यक्तीशी संवाद साधत साधत त्याचे मूड्स टिपणं मला अधिक आवडतं आणि साहजिकच माझ्याबरोबरच माझ्या फोटोंमधूनही त्याचं व्यक्तिमत्त्व उलगडतं, हेच माझ्या यशाचं रहस्य!'

गौतमजींचं आज अकाली निधन झाल्यामुळं त्यांच्या दहा-बारा वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. मुंबईत एक-दोन कार्यक्रमांत त्यांची भेट झाली, मात्र बोलणं काहीच झालं नव्हतं. पण त्यांनी सांगितलेलं त्यांच्या यशाचं रहस्य समजून सुद्धा पुन्हा दुसरा गौतम राजाध्यक्ष होऊ शकणार नाही, अशी फार मोठी पोकळी जाणवतेय. शेवटी गौतमजींचं वैशिष्ट्य आणि वेगळेपण सांगण्यासाठी मला 'चायना गेट'मधल्या मुकेश तिवारीच्या डॉयलॉगचा आधार घ्यावासा वाटतोय. तो म्हणाला होता, 'हमसे भिडने की हिम्मत तो जुटा लोगे, लेकिन वो कमीनापन कहाँ से लाओगे?' हाच डायलॉग बदलून गौतमजींच्या बाबतीत म्हणावंसं वाटतंय की,

'गौतम राजाध्यक्ष बनने की कोशिश तो जरुर करोगे, लेकिन वो 'नजर' कहाँ से लाओगे?'
हॅट्स ऑफ टू यू गौतम जी! वुई विल मिस यू फॉरेव्हर!!!