गुरुवार, २४ नोव्हेंबर, २०१६

प्रभावी 'गुगलिंग'साठी!





(महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या 'लोकराज्य'च्या नोव्हेंबर २०१६च्या अंकात 'गुगल' सर्च इंजिनचा प्रभावीपणे वापर कसा करावा, याविषयी लेख प्रसिद्ध झाला आहे. माझ्या ब्लॉग वाचकांसाठी येथे तो पुनर्प्रकाशित करीत आहे.- आलोक जत्राटकर)
साधारण अठरा वर्षांपूर्वी लॅरी पेज आणि सर्जी ब्रेन या दोघांनी 'गुगल' कंपनीची स्थापना करेपर्यंत जगाला केवळ क्रिकेटमधील 'गुगली' हा शब्द ठाऊक होता. गेल्या अठरा वर्षांत मात्र 'गुगल' या शब्दानं आपलं अवघं विश्व व्यापून टाकलं आहे. आजघडीला आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण इतर कोणाही पेक्षा गुगलची मदत घेणं पसंत करतो. 'फॉर एनी काईंड ऑफ क्वेरी, आय जस्ट गुगल!' असं आपण अभिमानानं सांगतो. गुगल या कंपनीचा हा एका शब्दापासून ते क्रियापद होण्यापर्यंतचा प्रवास चकित करणारा आहे. आपल्या प्रत्येक शंकेचं समाधान करणारं गुगल हे जणू आपल्या दैनंदिन जीवनातला वाटाड्या, व्हर्च्युअल गुरूच बनलं आहे.
इंटरनेटवर एकूण चालणाऱ्या माहितीच्या शोधांपैकी सुमारे 70 टक्के शोध हे गुगल सर्च इंजिनच्या सहाय्यानं केले जातात. उर्वरित 30 टक्के शोध अन्य सर्च इंजिन्सच्या सहाय्यानं घेतले जातात. इंटरनेटवर कोणत्याही माहितीचा शोध घेण्यासाठी गुगलचा वापर करावा, हे एव्हाना प्रत्येकाला ठाऊक झाले आहे. किंबहुना, त्याच्या इंटरनेट सर्फिंगची सुरवातच मुळी गुगलच्या होमपेजपासून होते. त्यामुळं शोधासाठी गुगल वापरणं, हे ठीकच आहे; परंतु, गुगलवरून आपल्याला हव्या त्या माहितीचा शोध अधिक प्रभावीपणे कसा घ्यावा, याची येथे आपण चर्चा करणार आहोत.
सर्वप्रथम आपल्याला कोणत्या पद्धतीची माहिती शोधायची आहे, ते वापरकर्त्याने ठरवावे. उदा. छायाचित्रे, व्हिडिओ, बातमी, पुस्तके किंवा इतर काही. याचे कारण म्हणजे गुगलवर वापरकर्त्यांच्या सोयीसाठी अनेक विविध महत्त्वाचे प्लॅटफॉर्म विकसित केलेले आहेत. त्या त्या ठिकाणी जाऊन संबंधित कॅटेगरीमध्ये अधिक प्रभावीपणे शोध घेणे सोयीचे जाते. गुगलच्या या प्लॅटफॉर्ममध्ये छायाचित्रांसाठी इमेजिस, फोटोज, पिकासा इ., व्हिडिओज, युट्यूब, न्यूज (बातम्या), ट्रान्सलेट (भाषांतरासाठी उपयुक्त), मॅप्स (नकाशे) व गुगल अर्थ, डॉक्स (कागदपत्रे), बुक्स (पुस्तके), ब्लॉगर (ब्लॉग लेखन, वाचन इ.साठी), स्कॉलर (संशोधनविषयक माहितीसाठी) आदींचा समावेश आहे. या ठिकाणी जाऊन वापरकर्ता त्याला हव्या त्या प्रकारचे संदर्भ, माहिती शोधू शकतो. याखेरीज, व्यावसायिकांना व्यवसाय वृद्धीसाठी ॲडवर्ड्स, ॲडसेन्स, जी-सूट, गुगल बिझनेस, ॲडमोब असे काही स्वतंत्र प्लॅटफॉर्म आहेत.
याखेरीज, पुढील काही बाबींचा वापर करून गुगलवरून आपला शोध अधिक प्रभावी करता येऊ शकेल.
विरामचिन्हांचा योग्य वापर: विविध विराम चिन्हांचा वापर करून आपल्याला हव्या असलेल्या नेमक्या माहितीचा शोध घेणे शक्य होते.  
अवतरण चिन्ह: गुगलच्या सर्च बारमध्ये अवतरण चिन्हात आपल्याला शोधायचा असलेला शब्द किंवा शब्दसमूह टाकल्यास केवळ त्या शब्दाचा अथवा शब्द समूहाचा समावेश असलेल्या माहितीची पानेच गुगल आपल्याला दाखवेल.
उदा. समजा, आपल्याला केवळ शिवाजी विद्यापीठाशी निगडित माहिती घ्यायची आहे; तर, अशा वेळी सर्च बारमध्ये "Shivaji University" असे दुहेरी अवतरण चिन्हासह टाइप करावे, म्हणजे केवळ तीच माहिती आपल्याला दिसेल.
वजा (-) चिन्ह: आपल्याला काही विशिष्ट माहिती वगळून त्याखेरीज अन्य माहिती हवी असल्यास वजा चिन्हाचा वापर करता येतो.
उदा. समजा, आपल्याला विद्यापीठ वगळून शिवाजी या शब्दाविषयी अन्य माहिती हवी असेल, तेव्हा सर्च बारमध्ये Shivaji -University असे टाइप करावे. यावेळी आपल्याला शिवाजी विद्यापीठाशी निगडित असलेली माहिती वगळून अन्य माहिती असणारी पाने दिसू लागतील.
स्वल्पविराम: जेव्हा आपल्याला एकापेक्षा अधिक शब्दांशी निगडित माहिती शोधावयाची असते, अशा वेळी स्वल्पविरामाचा वापर करावा.
उदा. समजा, आपल्याला शिवाजी विद्यापीठ आणि डॉ. देवानंद शिंदे यांच्याविषयीची माहिती शोधावयाची आहे, अशा वेळी सर्च बारमध्ये Shivaji University, Dr. Devanand Shinde असे टाइप करावे. यावेळी आपल्याला शिवाजी विद्यापीठ आणि डॉ. देवानंद शिंदे यांची एकत्रित तसेच स्वतंत्र माहिती असणारी वेबपेजेस दिसू लागतील.
AND आणि OR या शब्दांचा वापर:
उपरोक्त शोध अधिक प्रभावी करण्यासाठी AND किंवा OR या शब्दांचा वापर करता येतो. आपल्याला शिवाजी विद्यापीठ आणि डॉ. देवानंद शिंदे या दोहोंचा समावेश असणारी पानेच केवळ पाहायची असतील, अशा वेळी त्या दोहोंमध्ये कॅपिटल AND वापरावे. तसेच, दोहोंपैकी कोणत्याही एकाचा समावेश असणारी पाने पाहावयाची असतील, तर अशा वेळी त्या दोहोंमध्ये कॅपिटल OR वापरले जाते.
तुलनात्मक माहिती घेण्यासाठी vs चा वापर:
जेव्हा आपल्याला दोन घटकांची तुलनात्मक माहिती घ्यावयाची असेल, त्यावेळी त्या दोन शब्दांच्या मध्ये 'vs' या शब्दाचा वापर केला जातो.
उदा. साखर आणि गूळ यांची तुलनात्मक माहिती हवी असल्यास सर्च बारमध्ये Sugar vs Jaggery असे टाइप केल्यास दोहोंची तुलना करणारी माहिती सादर केली जाते.   
ॲस्टेरिस्क (*) चिन्हाचा वापर: जेव्हा आपल्याला एखाद्या कवितेमधील किंवा सुविचारामधील काही ठराविक शब्दच माहिती असतील, अशा वेळी ॲस्टेरिस्क चिन्ह आपल्या मदतीला धावून येते. आपल्याला माहिती असणाऱ्या शब्दांच्या मध्ये हे चिन्ह टाकले की, त्या संपूर्ण कवितेचा, ओळीचा समावेश असणारी पाने गुगल आपल्यासमोर सादर करते.
उदा. समजा, आपल्याला शिवमुद्रेमधील सुरवातीचे 'प्रतिपश्चंद्रलेखेव' आणि अखेरचे 'मुद्रा भद्राय राजते' एवढेच शब्द ठाऊक आहेत. परंतु, हा संपूर्ण श्लोक जाणून घेण्यासाठी आपल्याला या दोन शब्दांच्या मध्ये ॲस्टेरिस्क (*) चिन्ह टाकावे लागेल. त्यानंतर आपल्यासमोर 'प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता। शाहसनोशिवस्यैष मुद्रा भद्राय राजते' हा संपूर्ण श्लोक समाविष्ट असणारी पाने सादर होतात.
विशिष्ट वेबसाइटवरील माहिती शोधण्यासाठी:
आपल्याला संपूर्ण इंटरनेटवरील माहितीपेक्षा एका विशिष्ट वेबसाइटवरीलच माहिती शोधावयाची असल्यास site: असे टाइप करून त्यापुढे त्या वेबसाइटचा पत्ता आणि त्यापुढे त्यावर आपल्याला काय शोधायचे आहे, ते टाइप करावे.
उदा. समजा, आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाइटवर शासन निर्णय शोधावयाचे असतील, तर त्यासाठी सर्च बारमध्ये site:www.maharashtra.gov.in Government Resolution असे टाइप करावे.
शब्दार्थ, व्याख्या जाणून घेण्यासाठी:
एखाद्या शब्दाचा अर्थ किंवा व्याख्या जाणून घ्यावयाची असल्यास सर्च बारमध्ये कॅपिटलमध्ये DEFINE: असे टाइप करून ज्या शब्दाचा अर्थ, व्याख्या हवी आहे, तो टाइप करावा. त्याची व्याख्या गुगल आपल्यासमोर सादर करेल.
केवळ शीर्षकामधील, केवळ मजकुरामधील किंवा केवळ यु.आर.एल.मधील शब्द शोधण्यासाठी:
एखादा शब्द लेखाच्या शीर्षकामध्ये असेल आणि आपल्याला केवळ त्यावरुन लेख शोधावयाचा असेल, तर, allintitle: असे सर्च बारमध्ये टाइप करून त्यापुढे आपल्याला हवा असणारा शब्द लिहावा. केवळ अशी शीर्षके आपल्यापुढे सादर होतील. त्याऐवजी केवळ मजकुरातील शब्द शोधण्यासाठी allintext: असे टाइप करून तो शब्द लिहावा. त्याचप्रमाणे विशिष्ट यु.आर.एल.मधील (वेब ॲड्रेस) शब्द शोधण्यासाठी allinurl: असे टाइप करून त्यापुढे अभिप्रेत शब्द टाइप करावा. आपल्याला अपेक्षित वेबपेजेस गुगल सादर करेल.
कन्व्हर्जन:
आपल्याला एखादी रक्कम किंवा आकडा अन्य चलन अथवा मोजमाप यांत रुपांतरित करावयाचा असेल, तर त्यासाठी तो आकडा लिहून पुढे km to miles किंवा US dollar to Indian Rupees असे लिहीले की ते कन्व्हर्ट होऊन आपल्यासमोर सादर होईल.
व्हॉईस सर्च: स्मार्टफोन्समध्ये विशेषतः ॲन्ड्रॉईड सपोर्टेड मोबाईल फोनमध्ये होम स्क्रीनवरच गुगल सर्चचा महत्त्वाचा ऑप्शन असतो. त्यामध्ये सर्च बारच्या उजव्या बाजूला माईकचे चित्र असते. त्यावर क्लिक केले, की टाइप न करता केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्याला काय शोधायचे आहे, याच्या सूचना फोनला देता येऊ शकतात. आपण बोललेला शब्द सर्च बारमध्ये आपोआप टाइप होतो आणि तद्अनुषंगिक रिझल्ट स्क्रीनवर दिसू लागतात. पूर्वी हा पर्याय केवळ इंग्रजी भाषेसाठी उपलब्ध होता. आता अन्य भाषांसाठी सुद्धा ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे गुगलवरील शोधाची व्याप्ती आणखी वाढली आहे, हे निश्चित.
या लेखात सांगितलेल्या सोप्या सोप्या गोष्टींचा वापर करून गुगलवरील माहितीचा शोध आपण आणखी गतिमानतेने आणि अधिक नेमकेपणाने घेऊ शकतो. चला तर मग, लेट्स गुगल!

आणखीही काही महत्त्वाची सर्च इंजिन
गुगलची सर्च इंजिनच्या क्षेत्रात 70 टक्के मक्तेदारी प्रस्थापित असली तरी इतरही काही महत्त्वाची सर्च इंजिन आहेत. त्यामध्ये बिंग (Bing), याहू (Yahoo), चीनचे बैडू (Baidu), एओएल (AOL), आस्क डॉट कॉम (Ask.com), एक्साईट (Excite), डक-डक-गो (DuckDuckGo) आणि वुल्फ्रामअल्फा (WolframAlpha) यांचा समावेश आहे. डक-डक-गो हे सर्च इंजिन वापरकर्त्यांची प्रायव्हसी जपण्याला अधिक महत्त्व देते. त्यांची बिंग, याहू आणि यमली या सर्च इंजिनबरोबर भागीदारी आहे. त्याचप्रमाणे वुल्फ्रामअल्फा हे सर्च इंजिन कम्प्युटेशनल (गणितीय) नॉलेज इंजिन म्हणून वापरले जाते.

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०१६

वाटा ऑनलाइन शिक्षणाच्या!




(संपादक मित्रवर्य श्री. रावसाहेब पुजारी यांच्या तेजस प्रकाशनच्या 'बदलते जग' या दिवाळी वार्षिकांकाचे अतिथी संपादक म्हणून काम पाहण्याची संधी यंदा सलग पाचव्या वर्षी लाभली. यंदा या अंकासाठी 'दिशा दूरशिक्षणाच्या' असा विषय घेऊन दूरशिक्षणाच्या क्षेत्रातील विविध प्रवाहांचा वेध यामध्ये घेण्यात आला आहे. या अंकामधील माझा लेख ब्लॉग वाचक मित्रांसाठी येथे शेअर करीत आहे.- आलोक जत्राटकर)

दूरशिक्षणाकडे भारतीय परिप्रेक्ष्यातून पाहात असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे दूरशिक्षणाला अगदी गेल्या काही वर्षापूर्वीपर्यंत हवी ती प्रतिष्ठा जनमानसात दिली गेली नाही. बहिःस्थ शिक्षण अर्थात एक्सटर्नल एज्युकेशन या नावाने पारंपरिक उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात दूरशिक्षणाचा अंतर्भाव झाला खरा, परंतु, त्याकडे पाहण्याचा उदात्त दृष्टीकोन मात्र निर्माण झाला नाही. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्याविषयी एक असा समज निर्माण झाला की, विषय न सुटलेले, अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थीच बहिःस्थ शिक्षणाकडे वळतात. तत्कालीन परिस्थिती पाहता, त्यामध्ये तथ्यही होते. बहिःस्थ शिक्षणामध्ये विद्यार्थ्याने संपूर्ण अभ्यास स्वतः घरीच करून केवळ परीक्षेसाठी महाविद्यालयांत येणे अपेक्षित होते. दूरशिक्षणाच्या संकल्पनेत ही संकुचितता दूर करण्यात आली आणि विद्यार्थ्याला आवश्यक तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, अभ्यासाचे साहित्य, पुस्तके आदींची उपलब्धता करून देण्याची सोय येथे करण्यात आली. राष्ट्रीय पातळीवर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) तसेच महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांच्या स्थापनेनंतर दूरशिक्षणाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोनही पूर्वीपेक्षा अधिक व्यापक झाला. युजीसीने बहिःस्थ शिक्षण देणाऱ्या काही अकृषी विद्यापीठांकडेही दूरशिक्षणाची जबाबदारी सोपविली. त्यामुळे विविध कारणांनी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहिलेल्या कित्येक विद्यार्थ्यांना आपले उर्वरित शिक्षण पूर्ण करता आले, त्याचप्रमाणे पारंपरिक शिक्षणाव्यतिरिक्त आवश्यक अन्य आवडीचे शिक्षण घेण्याचा त्यांचा मार्गही या निमित्ताने खुला झाला. दूरशिक्षणाचा इतिहास इथे सांगण्याचा हेतू नसला तरी पूर्वपिठिका म्हणून या गोष्टी विचारात घेणे आवश्यक ठरते.
उपरोक्त पार्श्वभूमीवर, डिजिटल तंत्रज्ञानाचा आविष्कार झाला आणि त्याने जवळजवळ सर्वच क्षेत्रे आपल्या कवेत घेतली. शिक्षण क्षेत्र हे तर त्या आविष्काराचे प्रमुख केंद्र ठरले कारण त्या आविष्काराचे प्रमुख लाभार्थी आणि भवितव्यही तरुण विद्यार्थीच होते. शिक्षण क्षेत्रात आयसीटी (माहिती संवाद तंत्रज्ञान) हा अत्यंत कळीचा मुद्दा ठरू लागला. आयसीटी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षकांना अध्यापनासाठी नवनवीन पद्धती आविष्कृत कराव्या लागल्या. साहजिकच अध्ययन-अध्यापन प्रणाली अधिक प्रभावी बनविण्याच्या कामी आयसीटी तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त सिद्ध झाले.
आयसीटीमुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये आमुलाग्र बदल होत असतानाच दूरशिक्षणाच्या क्षेत्रावरही त्याचे परिणाम न होते, तरच नवल. तरुणांमध्ये इंटरनेटचा वाढता वापर, मोबाईल, स्मार्टफोन्सचे आधुनिक तंत्रज्ञान, टॅब्लेट, पीसीच्या तंत्रज्ञानात झालेले क्रांतीकारक बदल या सर्व गोष्टींमुळे दूरशिक्षणाचे क्षेत्रही प्रभावित झाले. दूरशिक्षणाच्या नवनवीन पद्धतींची निर्मिती सुरू झाली.
दूरशिक्षणामध्ये कॉरस्पॉन्डन्स कोर्स लोकप्रिय झाले होते. संबंधित मुक्त विद्यापीठाकडे नोंदणी करून टपालाद्वारे त्यांचे कोर्स मटेरिअल प्राप्त करून घ्यावयाचे आणि वर्षाखेरीस परीक्षा द्यायची, असे या कोर्सचे स्वरुप असे. डिजीटल क्रांतीमुळे इंटरनेटने या कॉरस्पॉन्डन्सची जागा घेतली. मॅसिव्ह ऑनलाइन ओपन कोर्स अर्थात MOOC अभ्यासक्रमांचा कालखंड सन २०१२पासून सुरू झाला. 'द न्यूयॉर्क टाइम्स'ने सन २०१२ला 'मूक'चे वर्ष असे म्हटले. याचे कारण म्हणजे या एका वर्षातच कोर्सेरा, युडॅसिटी आणि ईडीएक्स हे तीन ऑनलाईन अभ्यासक्रमांचे अत्यंत महत्त्वाचे प्लॅटफॉर्म कार्यान्वित झाले. या तीनही प्लॅटफॉर्म्सनी ऑनलाईन एज्युकेशन अथवा ई-लर्निंगच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली आणि आजतागायत या क्षेत्रात आपली विश्वासार्हता आणि लोकप्रियता कायम राखली आहे. या प्लॅटफॉर्मवर जगभरातील अनेक नामांकित विद्यापीठांचे विविध अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
पूर्वीप्रमाणे आता मात्र दूरशिक्षणाच्या बाबतीतला गैरसमज राहिलेला नाही. उलट पारंपरिक शिक्षणाला पूरक अथवा अधिक आवश्यक शिक्षण घेण्याच्या दृष्टीने हे ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरत आहेत. पारंपरिक शिक्षणाच्या तुलनेत ऑनलाइन शिक्षणक्रमाचे लाभही अनेक आहेत. सर्वात महत्त्वाचा लाभ म्हणजे पहिल्याच टप्प्यात शैक्षणिक शुल्क आणि क्लासरुम या गोष्टींना फाटा मिळतो. आपल्या वेळेनुसार हव्या त्या वेळी बंधनमुक्त अभ्यास करणे ऑनलाइन पद्धतीत सहज शक्य आहे. आपल्याला हवं ते शिकण्याची संधी या प्लॅटफॉर्मवर मिळते, जी पारंपरिक शिक्षणात कमी असते. त्याचप्रमाणे पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करावी लागत असते. त्यासाठी येणारा खर्च अधिक असतो. साहजिकच पारंपरिक शिक्षण हे ऑनलाइन शिक्षणाच्या तुलनेत कितीतरी खर्चिक ठरते. किंबहुना, कित्येक ऑनलाइन अभ्यासक्रम हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत किफायतशीर दरात किंवा अगदी मोफत सुद्धा उपलब्ध आहेत. आणि महत्त्वाचे म्हणजे जगातल्या कोणत्याही विद्यापीठातील अभ्यासक्रम विद्यार्थी घरबसल्या शिकू शकतो. पारंपरिक शिक्षणासाठी विद्यार्थ्याला प्रत्यक्ष त्या विद्यापीठात जाणे शक्य असले तरी त्यासाठी त्या संबंधित देशाचा व्हिसा, तेथील राहणीमान, नवीन वातावरण या साऱ्यांशी जुळवून घेण्यासाठी काही वेळ आणि बराचसा पैसा खर्च करावा लागत असतो. ऑनलाइन अभ्यास करीत असताना या सर्व गोष्टींना फाटा दिला जातो आणि विद्यार्थी थेट अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकतो.
ऑनलाइन पद्धतीमध्ये आपल्याला पारंपरिक पद्धतीमधील कोणताही अभ्यासक्रम घेऊन नियमित अभ्यास करता येऊ शकतो. केवळ गुगलवर जाऊन आपल्या आवडीचा अभ्यासक्रम टाइप केला की, जगभरात तो विषय उपलब्ध असणाऱ्या विद्यापीठांची यादी आपल्यासमोर येते. त्यातून आपल्याला हवे असणारे विद्यापीठ निवडून आपण त्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतो. केवळ एखाद्या विषयात रुची आहे म्हणून किंवा त्याविषयी तपशीलात जाणून घेण्याची उत्सुकता, जिज्ञासा म्हणूनही आपण अशा अभ्यासक्रमांना अर्ज करू शकतो आणि त्यांचा अभ्यास करू शकतो, ते सुद्धा कोठेही न जाता.
याठिकाणी केवळ आवड म्हणून एखाद्या विषयाची शास्त्रशुद्ध माहिती घेऊन आपल्या छंदाचे अभ्यासात रुपांतर करणारे एक जवळचे उदाहरण दिल्याखेरीज राहवत नाही. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात उपसंचालक असणाऱ्या श्री. सतीश लळित यांना ट्रेकिंगचा छंद आहे. या छंदातून ठिकठिकाणच्या प्राचीन वास्तू, विशेषतः मंदिरे, गुहा, लेणी आदी गोष्टींची पाहणी करण्याची त्यांना आवड आहे. कोकणातील काही महत्त्वाच्या कातळशिल्पांचा शोध त्यांनी लावला आहे. अनेक ठिकाणच्या वीरगळांची माहिती घेऊन ती नोंद करण्याचा प्रयत्नही ते करतात. या संदर्भात त्यांचा शोधनिबंधही प्रकाशित झाला आहे. या पाषाणकलेविषयीचा अभ्यासक्रम केवळ आवडीपोटी त्यांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन निवडला आणि तो यशस्वीरित्या पूर्ण केला, तो सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी असण्याच्या कालखंडात. म्हणजे एवढी मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी असताना आणि उसंत नावाचा प्रकार नसतानाही केवळ आवडीपोटी त्यांनी पाषाणकलेच्या अभ्यासासाठी वेळ काढला. हे वेळेचे व्यवस्थापन ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे ठरते.
दुसरे म्हणजे या साऱ्या अभ्यासक्रमाचे साहित्य आपल्याला ऑनलाइन उपलब्ध करुन दिले जात असल्याने आपल्या सोयीच्या वेळेनुसार ते आपण पाहून अभ्यास करू शकतो. घरबसल्या साऱ्या गोष्टी प्राप्त होत असल्यामुळे त्यासाठी इंधन जाळून बाहेर जावे लागत नाही किंवा कपडे वगैरे घालून तयार होऊन बसण्याचीही गरज भासत नाही. ही आरामदायिकता एकीकडे फायद्याची आहे, परंतु, ती फारच अंगावर येणारीही असायला नको. घरबसल्या अभ्यास करण्यामधला सर्वात मोठा धोका किंवा तोटा हा असा होऊ शकतो की, आपला आळस तिथे आडवा येण्याची शक्यता असते. त्यामुळे घरी आपण आरामशीर असलो तरी अभ्यासाची खोली, तिथले अभ्यासपूर्ण वातावरण जाणीवपूर्वक जपण्याची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्याची असते. ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. याची काळजी घेतली गेली नाही, तर वेळेत अभ्यासक्रम पूर्ण होणे अशक्य ठरते. पारंपरिक शिक्षणपद्धतीमध्ये अभ्यासाचे, परीक्षेचे किंवा एकूणच सारे वेळापत्रक तयार करणारी विद्यापीठीय यंत्रणा असते. ऑनलाइन अभ्यासक्रमात मात्र घरच्या घरी अभ्यासाला पूरक आणि पोषक वातावरण निर्माण करून नियोजनबद्ध अभ्यास करण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्याची आणि विद्यार्थ्याचीच असते, हे लक्षात घ्यायला हवे.
ऑनलाइन अभ्यासक्रमांचे आणखी एक महत्त्व म्हणजे आपल्या बायोडाटावर ते खूप वेगळ्या पद्धतीने उठून दिसतात. आपण खाजगी किंवा शासकीय कोणत्याही नोकरीत असलात, तरी नवे ज्ञान, नवे कौशल्य आत्मसात करण्याची इच्छाशक्ती अधोरेखित करण्याचे कार्य आपण पूर्ण केलेले ऑनलाइन अभ्यासक्रम करीत असतात. खाजगी नोकरी बदलत असताना नवीन एम्प्लॉयर आपल्या मूलभूत शैक्षणिक पात्रतेबरोबरच ऑनलाइन पदवी, पदविका पाहून प्रभावित होऊ शकतो. कारण त्यातून संबंधित उमेदवारामध्ये नवीन शिकण्याची, नवीन काही करण्याची उमेद आहे, ही बाब केवळ बायोडाटावर नजर टाकूनच त्याला समजू शकते आणि त्यातून त्याची निवड होण्याची शक्यता वृद्धिंगत होते.
ऑनलाइन अभ्यासक्रमाच्या संदर्भातला महत्त्वाचा भाग म्हणजे हा अभ्यासक्रम विद्यार्थी त्याच्या सोयीनुसार कितीही कालावधीत संपवू शकतो. दिवसा किंवा रात्री सोयीच्या वेळी अभ्यास करून अगदी अल्प वेळेत आपण हा अभ्यासक्रम संपवू शकतो. ही गतिमानता आणि लवचिकता पारंपरिक शिक्षणपद्धतीमध्ये नसते. किमान वेळेत अभ्यास पूर्ण करण्याची संधी येथे असते. तथापि, किमान निर्धारित वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे नियोजन विद्यार्थ्याने करणे आवश्यक असते. अन्यथा, हा अभ्यासक्रमाचा कालावधी लांबूही शकतो. तसे होऊ न देण्याची जबाबदारी त्या विद्यार्थ्यावर असते.
सुरवातीला म्हटल्याप्रमाणे अत्यल्प खर्च किंवा अगदी मोफत या पद्धतीने ऑनलाइन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात. बऱ्याचदा मोफत असणाऱ्या अभ्यासक्रमांच्या पूर्ततेनंतर प्रमाणपत्र दिले जात नाही. तरीही, नामांकित शिक्षण संस्थांकडून ते शिक्षण प्राप्त केल्याचा आनंद कोणी हिरावून घेऊ शकत नाही.
थोडक्यात काय, तर ऑनलाइन अभ्यासक्रम हे पारंपरिक शिक्षणपद्धतीच्या तुलनेत त्यांच्या लवचिकतेमुळे आणि अभ्यासक्रमातील वैविध्यतेमुळे अगदी अल्पावधीत जगभरात विद्यार्थीप्रिय झाले आहेत. विद्यार्थ्यांप्रमाणेच नोकरदार, व्यावसायिक वर्गही स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी अगर आवडीपोटीही ऑनलाइन अभ्यासक्रम शिकण्याला प्राधान्य देत आहे. शिकण्यातला निखळ आनंद प्राप्त करून देण्यामध्ये ऑनलाइन अभ्यासक्रम अत्यंत मोलाची कामगिरी बजावित आहेत.


ऑनलाइन शिक्षणात 'मुडल' महत्त्वाचे!
मुडल शिक्षण प्रणाली ही अत्यंत लवचिक, प्रभावी व आवश्यकतेनुसार बदलता येणारी मुक्त स्रोत संगणक प्रणाली आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठासह जगातील अनेक शाळा व महाविद्यालये यांचा यशस्वीपणे वापर करीत आहेत. शिक्षणप्रक्रियेचा मूलभूत विचार घेऊन मुडल ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. मुडल प्रणालीत शिकविणे व शिकणे या दोन्ही क्रियांतील वैयक्तिक तसेच  सामूहिक कृतीशीलतेला मह्त्वाचे स्थान दिले आहे. पेडॉगॉजी (Pedogogy) म्हणजे लहान मुलांना शिकविण्याची पद्धत व अँड्रागॉजी (Andragogy) म्हणजे प्रौढांना  शिकविण्याची पद्धत या दोन परस्पर भिन्न पद्धतींचा यथायोग्य उपयोग करणे शक्य व्हावे, हे उद्दिष्ट ठेवून मुडल प्रणालीची रचना केली आहे. पेडॉगॉजी ही शिक्षणाची रूढ पद्धत असून विद्यार्थ्याला नवीन शिकण्यास उद्युक्त करणे, त्याच्या जिज्ञासेला प्रोत्साहन देऊन नवी माहिती देणे  याला इथे महत्व आहे. येथे शिक्षकाला महत्वाचे स्थान असून कल्पनाशक्ती व आपला शिकवण्याचा अनुभव याद्वारे तो विद्यार्थ्याला ज्ञान देतो. विद्यार्थ्यांकडून कृती करवून घेतो.  तर प्रौढांना शिकविताना त्यांची शिकण्याची क्षमता, त्यांचा अनुभव व शिकलेल्या ज्ञानावर आधारित जबाबदारी स्वीकारण्याची तयारी यांचा विचार करून त्यांना स्वयंशिक्षणासाठी प्रेरित केले जाते. येथे शिक्षकाची जबाबदारी मार्गदर्शनाची रहाते. शिक्षण देणे व शिक्षण घेणे या गोष्टींची शिक्षक व विद्यार्थी या गटात विभागणी करण्यावजी खर्‍या शिक्षण पद्धतीत  शिक्षक व विद्यार्थी एकत्रितपणे विषय समजावून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे या क्रियेत शिकणे व शिकविणे या दोन्ही भूमिका परस्परांना घ्याव्या लागतात. विद्यार्थ्याने आपल्याला समजलेले आपल्या भाषेत पुनः शिक्षकाला वा इतर विद्यार्थ्यांना सांगणे वा त्यावर आधारित कृती करणे यात अभिप्रेत असते. अशा सामूहिक कृतीस पोषक असे मुक्त चर्चा व्यासपीठ (फोरम) ठेवणे मुडलमध्ये शक्य असते. याशिवाय, शिक्षक अनेक प्रकारचे अभ्यास साहित्य व मल्टीमिडीया सुविधांचा वापर करून विद्यार्थ्यांना ज्ञान देऊ शकतात. विद्यार्थ्यांना समजलेल्या माहितीचे मूल्यांकन करण्यासाठी विविध प्रकारचे प्रश्न विचारणे, परीक्षा घेणे  वा प्रकल्प करवून घेणे शिक्षकास शक्य असते. मुडल प्रणालीत सर्व्हरवर सर्व शैक्षणिक सुविधा देणारा डाटाबेस (माहिती कक्ष) व त्यावर आधारित डायनॅमिक वेबसाईट यांचा वापर केला जातो. या पद्धतीत वेबसाईट व्यवस्थापक, शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी वेगवेगळी  प्रवेशद्वारे असून त्यांना विशिष्ट अधिकार देता येतात.


'मूक' अभ्यासक्रम प्रदाते
मूक (MOOC) अर्थात मासिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस हे ऑनलाइन अभ्यासक्रम शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास डिझाईन केलेले अभ्यासक्रम आहेत. अशा सेवा पुरविणारे जगभरात अनेक प्लॅटफॉर्म असले तरी कोर्सेरा (coursera.org), ईडीएक्स (edx.org), युडॅसिटी (udacity.com) आणि अकॅडेमिकअर्थ (academicearth.org) हे प्लॅटफॉर्म जगभरातील विविध विद्यापीठांमधील 'मूक' अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आघाडीवर आहेत.

मुक्त आणि मोफत
इंटरनेटवरील विकीपेडिया हा सर्वसामान्यांसाठी माहितीचा अत्यंत मुक्त आणि मोफत असा खजिना आहे, जो दिवसेंदिवस समृद्ध होत चालला आहे. पण त्यामध्ये लिहीणारे विषयतज्ज्ञच असतील, असे नसते. ते लिहीण्यासाठीही मुक्त ठेवले असल्याने काही प्रसंगी माहितीच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा विकीपेडियावरील माहिती कन्फर्म करण्याची जबाबदारी माहिती घेणाऱ्यावर सर्वस्वी अवलंबून असते. याव्यतिरिक्त ऑनलाइन एज्युकेशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेतील एमआयटी (मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) या संस्थेने ओपन कोर्स वेअर उपलब्ध केले आहेत. ocw.mit.edu या पोर्टलवर जाऊन विद्यार्थी तेथील अभ्यासक्रम पाहू, शिकू शकतो. कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीनेही शिक्षक-विद्यार्थी यांच्यासाठी मर्लोट (www.merlot.org) या पोर्टलवर अशा मुक्त व मोफत अभ्यासक्रमांची उपलब्धता केली आहे. याशिवाय, येल, स्टॅनफोर्ड, हार्वर्ड आदी अनेक नामांकित विद्यापीठांनीही आपापल्या प्लॅटफॉर्मवरुन ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा जगभरातल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केल्या आहेत.
खान अकेडमी (www.khanacademy.org) हे या क्षेत्रातले एक नामांकित नाव. सलमान खान या एमआयटीचा त्रि-पदवीधारक व हार्वड विद्यापीठाचा एमबीए असणाऱ्या तरुणाने आपल्या पुतण्यांना विषय समजावून देण्यासाठी म्हणून सुरू केलेला उपक्रम आज जगभरातील तरुणांचा मार्गदर्शक बनला आहे. गणित, विज्ञान, तंत्रज्ञानादी अनेक विषयांशी निगडित अभ्यासक्रम या ऑनलाइन खान अकेडमीमध्ये मोफत उपलब्ध करण्यात आले आहेत. त्या त्या विषयातील तज्ज्ञांची फौजच इथे विद्यार्थ्यांना सहकार्य व मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसते. वैशिष्ट्य म्हणजे टॉबी (डायरेक्टर ऑफ वेलनेस), फ्लीटवूड (चीफ लेझीनेस ऑफिसर) आणि पिप्पी (हेड ऑफ फूड सेफ्टी) या तीन श्वानांनाही टीम मेंबर्समध्ये सन्मानाचे स्थान प्रदान करण्यात आले आहे.

भारतीय अभ्यासक्रम प्रदाते
भारत सरकारच्या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सहकार्य व प्रेरणेतून मुंबई, दिल्ली, गुवाहाटी, कानपूर, खरगपूर, मद्रास व रुरकी येथील आयआयटी आणि आयआयएससी, बंगळूर या महत्त्वाच्या शिक्षण संस्थांनी एकत्रित येऊन एन.पी.टी.ई.एल. अर्थात नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स्ड लर्निंग (http://nptel.ac.in/) हा मुक्त ऑनलाइन अभ्यासाचा प्लॅटफॉर्म विकसित केला असून त्याअंतर्गत सध्या ९०हून अधिक अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आले आहेत. भारतीय मुक्त ऑनलाइन शिक्षण प्रदानाच्या क्षेत्रात या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मोठी क्रांती होणे अपेक्षित आहे. याखेरीज आयआयटी-कानपूर यांनी विकसित केलेला बृहस्पती-३ हा पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी उपयुक्त प्लॅटफॉर्म तसेच भारतातील व्हीसॅट ऑपरेटर ह्युजेस ग्लोबल एज्युकेशनसाठी कोलकता, लखनौ व कोझिकोड येथील आयआयएम, मुंबई व दिल्ली आयआयटी व एक्सएलआरआय, जमशेदपूर यांनी एकत्रित येऊन विकसित केलेला ऑनलाइन शिक्षणाचा प्लॅटफॉर्मही महत्त्वाचा आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) वेबसाईटसह मोबाईल व व्हीसॅटच्या माध्यमातून व्हर्च्युअल क्लासरुम विकसित करून त्याद्वारे विविध पदवी व पदव्युत्तर ऑनलाइन दूरशिक्षण अभ्यासक्रम चालविले आहेत.
सीके-१२ (http://www.ck12.org/) हा असाच आणखी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे, जिथे विविध विषयांतील क्रमिक पुस्तकांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. याखेरीज, एज्युकॉम्प (Educomp), ट्युटरव्हिस्टा (TutorVista.com), एव्हरॉन (Everonn), विझआयक्यू (WizIQ.com) तसेच एन.आय.आय.टी.चा nGuru.com हे खाजगी प्लॅटफॉर्मही ऑनलाइन एज्युकेशनशी निगडित विविध सेवा निर्माण करून प्रदान करण्यामध्ये आघाडीवर आहेत.