गुरुवार, ९ नोव्हेंबर, २०१७

अजान!




(कोल्हापूर सकाळनं सालाबादप्रमाणं यंदाच्या दिवाळी अंकातही लिखाणाची संधी दिली. 'आठवणीतला अनुभव' या विषयावर लिहीण्यास सांगण्यात आले. त्यातून खरंच बालपणीच्या काही रम्य आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळाली. हा लेख इथं माझ्या ब्लॉगवाचकांसाठी सकाळच्या सौजन्यानं प्रकाशित करतो आहे. धन्यवाद... आलोक जत्राटकर)

अल्ला हो अकबरअल्लाSSSS ……
सकाळी सकाळी पवित्र अजान झाली की जागं होऊन हात पाय तोंड धुवून अभ्यासाला बसण्याचे ते दिवस. बाबांची तशी ताकीदच होती. त्यापूर्वीच्या काळात त्याहून लहान असताना सांगलीत अजान झाली की, आजोबा उठायचे, मलाही त्या बांगेनं जाग यायची; पण डोळे मिटून पडून राहावंसं वाटायचं. आजोबा फ्रेश झाले की, माझ्या केसातून प्रेमानं हात फिरवायचे, विचारायचे, बाळा, येणारायस ना फिरायला?” त्यांनी तसं विचारलं की आपसूक उठायचो. दोन मिनिटांत उगाच तोंड धुतल्यासारखं करून लगेच पायात स्लीपर सरकवून त्यांचा हात धरून चालायला सुरवात करायचो. असं अजानच्या साथीनं माझा त्यावेळचा दिवस सुरू होत असे. म्हणतात ना, लवकर नीजे, लवकर उठे, त्यास ज्ञान, आरोग्य, संपत्ती लाभे!” माझ्या बाबतीत हे लवकर उठविण्याचं काम पहाटेची अजान नित्यनेमानं करीत राहिली. गजराची गरज मला तेव्हाच पडायची, जेव्हा पहिल्या अजानच्याही आधी मला उठायचं असायचं; अन्यथा नाही.
कागलच्या सोमवार पेठेतला गैबीनाथाचा दर्गा
कागलमधला माझ्या बालपणाचा कालखंड असा नित्यानं अजानच्या सान्निध्यात गेला. त्यात काही वेगळं, परकं असं काही आहे, असं कधीही वाटलं नाही; आजही वाटत नाही. आम्ही सोमवार पेठेतल्या कागले वाड्यात राहायचो. हा वाडा म्हणजे भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचं एक छोटंसं प्रतीकच होतं म्हणा ना! विविधतेतून एकतेचा संदेश द्यायला किंवा शिकायला आम्हाला कुणाच्या भाषणबाजीची काही गरजच नव्हती. वाड्याचे मालक म्हणजे कागले काका हे तसे मुस्लीम.तसे म्हणण्याचं कारण म्हणजे आपल्याला प्रत्येकाला एकमेकांशी जोडलं जायला कोणत्या ना कोणत्या जातीची- धर्माची गरज असते. किंबहुना, एखाद्याशी जोडलं जायचं की नाही, की तोडून दूर व्हायचं, याचा निर्णय या घटकांवर अवलंबून असतो. कागले काका आणि त्यांचं सारं कुटुंब हे धार्मिक बाबतीत मुस्लीम असलं तरी सामाजिकतेच्या बाबतीत मात्र भारतीयत्व अनुसरणारं होतं, नव्हे, आहे. मुस्लीम सनातनवादापासून कोसो दूर. त्यामुळंच आमच्या वाड्यात मेस्त्री साहेब, काटकर सर, पाटील काका, पठाण भैय्या, जाधव काका, शिंत्रे मामी, मुल्ला सर, नाईक मामा, कांबळे सर, पोतदार बाई, घस्ते बाई अशा अनेक फॅमिली आनंदात राहून गेल्या. आजही राहताहेत. 
कागले वाडा
आम्ही साधारण ११ वर्षं याच वाड्यात राहिलो. या वाड्याच्या आठवणींमध्ये माझं सारं बालपण दडलेलं आहे. एकेक आठवण येत राहते आणि तो सुखाचा काळ नजरेसमोर पुनःपुन्हा तरळत राहतो. जेव्हा मित्र-मैत्रिणी म्हणजे काय, हेही समजण्याचं वय नव्हतं- म्हणजे जेव्हा बालवाडीतही जात नव्हतो- त्या वयात काटकर सरांचा अजित आणि पाटील काकांची राणी हे माझ्या आयुष्यातले पहिले-वहिले मित्र-मैत्रीण म्हणून मला मिळाले. राणीचं लग्न होऊन गेल्यानंतर तिचा संपर्क तुटल्यासारखा झालाय, पण अजितशी निःस्वार्थ मैत्री आजही टिकून आहे. मेस्त्री काकांचा संजूदादा आजही आठवतोय- अगदी त्यानं वाड्याच्या दरवाज्यावर चिकटवलेल्या अमिताभच्या त्रिशूलच्या पोस्टरसकट.
कागले काका-मावशींना वाड्यातली सारीच मंडळी काका-मावशीच म्हणायची. त्यामुळं त्यांच्या नातवांच्या वयाचे आम्ही सुद्धा त्यांना काका आणि मावशीच म्हणायचो. त्यांची मुलं म्हणजे राजूमामा, बाळूमामा आणि बबलूमामा. या प्रत्येकाशी माझं वेगळ्या पद्धतीनं नातं जोडलं गेलेलं होतं.
राजूमामा हा अत्यंत सिन्सिअर, बाळूमामा काहीसा अंतर्मुख स्वभावाचा तर बबलूमामा एकदम दिलखुलास आणि खुशमिजाज. राजूमामानं मला बाल्या हे संबोधन दिलेलं. मग हळूहळू हा साराच मामावर्ग मला बाल्याच म्हणू लागला. राजूमामा कामानिमित्त लवकरच पुण्याला शिफ्ट झाला. मात्र, तो आला की आवर्जून अभ्यासाची चौकशी करायचा, निकाल विचारायचा आणि पुढच्या परीक्षेत अजून जोरात अभ्यास कर, असं सांगत राहायचा. राजूमामाशी आणि कागले फॅमिलीशी माझं नातं इतकं जुळलेलं होतं की, पुढं बारावीच्या वेळी जेव्हा मी पुण्याला क्लासला गेलो, तेव्हा अनोळखी पुण्यात राजूमामा आणि कागले काकांचे जावई देसाई काका असल्याचा केवढा तरी मोठा आधार मला वाटत असे.
बाळूमामा फारसं काही बोलायचा नाही, पण त्याचं स्थानिक मित्रमंडळ मात्र जबराट होतं. त्यातनंच मला शौकतमामा हा माझा गायनातला पहिला गुरू भेटला. मेघा रे मेघा रे... हे त्याचं एकदम पेटंट गाणं. बोलताना अडखळणाऱ्या शौकतमामाचं गाणं मात्र एकदम लयीत असायचं. ते त्यांचं गाणं माझ्या मनात इतकं पक्कं घर करून बसलं होतं की, हे गाणं सुरेश वाडकरांनी म्हटलंय, हे मला खूप नंतर कळालं. तोपर्यंत माझ्यासाठी त्याचा गायक शौकतमामाच होता. माझी गॅदरिंगची गाणी बसवायला शौकतमामाच असायचा. नंतरच्या काळातही त्यांचं मार्गदर्शन लाभतच राहिलं.
बबलूमामा तर वाड्यातल्या मनोरंजनाचा हुकमी एक्काच होता. बसल्या बसल्या अनेक गंमतीजंमती सांगून सर्वांना हसवणं, हा त्याचा आवडीचा छंद होता जणू. त्याच्या या मिसळण्याच्या स्वभावामुळं तो आम्हा मुलांचाही लाडका मामा होता. मला आठवतंय, माझ्या चौथीच्या आणि सातवीच्या स्कॉलरशीपच्या परीक्षेवेळी माझा गणिताचा अभ्यास घ्यायला बाबांच्या बरोबरीनं बबलूमामा रात्र रात्र जागायचा.
कागले काका आणि आमच्या तेव्हाच्या घराचा दरवाजा
कागले काका संध्याकाळी आमच्या दारात कट्ट्यावर पेपर, मासिकं वाचत बसायचे. एक सांगायचं राहिलं, कागले काकांचं आणि आमचं घर- म्हणजे आम्हाला भाड्यानं दिलेल्या दोन खोल्या, या त्यांच्याच घराचा हिस्सा होत्या. मधले दोन दरवाजे बंद करून दोन खोल्या आम्हाला भाड्यानं दिलेल्या. पण, या दोन खोल्याही इतक्या प्रशस्त होत्या की, त्यांना पडद्याचं पार्टीशन करून आम्ही चांगल्या चार खोल्या जणू वापरत होतो. मध्ये अडीच फुटी भिंत असली तरी, वरुन माळ्यासारखी जागा मोकळीच होती, त्यामुळं मी सोडलेली कागदी विमानं बरेचदा कागले मावशींच्या स्वयंपाकघरात लँड होत असत. त्यावर ए बाबा, तुझं विमान परत आलं तर बघ हां, असं मावशी ओरडायच्या. पण, ते तात्पुरतं असायचं, हे मला माहीत असल्यानं मी तेवढ्यापुरतं होय म्हणून रिकामा होत असे. जेवायला बसलं की, तिथूनंच मोठ्यानं हाक देऊन सर, कालचा रस्सा हाय अजून. देऊ काय जरासा?’ असं मावशी आपुलकीनं बाबांना विचारायच्या. असो! तर, त्यांचा नि आमचा- मागचा पुढचा दरवाजाही लागूनच होता. तर, कागले काका पेपर वाचत बसले की, त्यांना दुकानातून तीस छापचं बंडल आणून देण्याचं महत्त्वाचं काम मी बरेचदा करायचो. त्याव्यतिरिक्त किरकोळ, मला झेपतील, अशी कामं मी दिसलो की, ते सांगत असत. काकांच्या स्वभावात एक प्रकारचा मिस्कीलपणा भरून उरलेला होता. कोणत्याही चर्चेवेळी बोलताना समोरच्याला उद्देशून काय?’ असं विचारायची किंवा सांगायची, त्यांची लकब होती. म्हणजे ते अर्धा तास बोलत राहिले, तर साधारण अर्धा पोतं काय सहज बाजूला काढता येऊ शकले असते. पण, आपलं म्हणणं अधिक इंटरेस्टींग करून सांगण्यासाठी ते या सर्व कायांचा वापर करत असत. त्यामुळं त्यांची ही एखादी गोष्ट खुलवून सांगण्याची स्टाईल मला व्यक्तीशः खूप आवडायची. काकांना आपल्या मुलांचा, जावयांचा, मुलींचा आणि अगदी नातवंडांचाही खूप अभिमान होता. हा अभिमान आणि प्रेम त्यांच्या शब्दांशब्दांतून पाझरत असायचं. माझ्याबद्दलही त्यांच्या मनात प्रेमाचा ओलावा होता. माझ्या दहावीच्या परीक्षेच्या वेळी काकांनी आठवणीनं पत्र पाठवून मला शुभेच्छा दिल्या होत्या. ते पत्र आजही जपून ठेवलंय मी.
राजूमामा पुण्याच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीत होते. त्यांच्या टीमच्या एका इनोव्हेशनबद्दल रणगाड्याची प्रतिकृती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला होता. राजूमामानं घरी येऊन ते दाखवलं, तेव्हा काकांच्या मनात आनंद मावत नव्हता. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाला ते ती प्रतिकृती दाखवून राजूमामाचं कौतुक करीत होते, पुढचे कित्येक दिवस. ब्लॅक ॲन्ड व्हाईट टीव्हीचंही दर्शन ज्या काळात दुर्मिळ होतं, त्या काळात राजूमामानं पुण्याहून कलर टीव्ही आणि व्हीसीआर पाठविला, तेव्हा तर काका त्याचं कौतुक करताना थकत नव्हते. राजूमामा हा त्यांच्या परमोच्च अभिमानाचा विषय होता, नेहमीच.
कागले मावशींशी माझं एक खास नातं होतं. त्यांची नातवंडं दूर होती आणि अजून बाळूमामा, बबलूमामाचं लग्न व्हायचं असल्यानं मीच त्यांच्या नातवाच्या भूमिकेत असायचो. स्टोव्हची पीन मारुन देण्यासाठी आणि सुईत दोरा ओवून देण्यासाठी त्यांना हमखास मदत लागायची. जी कामं मी अगदी सहज करू शकतो, ती मावशींना कशी काय बुवा जमत नसतील, असा विचार मनात येऊन मला मोठी मौज वाटायची. पण, त्याचवेळी स्टोव्हची पीन मारुन देणं, सुईत धागा विणून देणं, ही अत्यंत जबाबदारीची कामं मावशी आपल्यालाच सांगतात, याबद्दल स्वतःचा अभिमानही वाटायचा. ईदच्या काळात माझ्यावरची जबाबदारी वाढलेली असायची. मावशींचे शिरखुर्म्याचे डबे गावात अनेक घरी पोहोचवायचे असायचे. ते डबे न सांडता संबंधिताच्या घरी पोहोचवून धुवून लगेच घेऊन परत येऊन पुढच्या मोहिमेला रवाना होण्याची कौशल्यपूर्ण जबाबदारी मी पार पाडत असे. हे काम मी अत्यंत निःस्वार्थ भावनेनं करत होतो, असा दावा मात्र मी करणार नाही. कारण मोहिमेला रवाना होण्यापूर्वी शिरखुर्म्याची चव चाखून देण्याची जबाबदारी मी जितक्या आत्मीयतेनं पार पाडायचो, परतल्यानंतर त्याहूनही अधिक आत्मीयतेनं चव घेत हवा तितके वाडगे शिरखुर्मा फस्त करण्याची मुभा मावशींकडे मला असायची. मावशींच्या हातच्या त्या खिरीची चव माझ्या जीभेवर इतकी रुळलेली आहे की, आजही कोठेही खाताना त्याची तुलना अगदी स्वाभाविकपणे मावशींच्या शिरखुर्म्याशी होते. विशेष म्हणजे आजतागायत मावशींच्या शिरखुर्म्याला मात देणारा शिरखुर्मा माझ्या खाण्यात-पाहण्यात आलेला नाही. तेवढंच कशाला, मावशींनी बनविलेल्या चोंगे, मलिदा, रोट आणि अगदी मटणाच्या रश्श्याची सुद्धा चव मला वाडा सोडल्यापासून कधीही, कोठेही अनुभवायला मिळालेली नाही. मावशींच्या हातच्या या प्रत्येक पदार्थाला एक विशिष्ट चव, आपुलकीचा स्वाद असायचा. मावशींनी बनविलेला दालच्या असू दे, साधी तुरीची आमटी असू दे की आंबोळी आणि बटाट्याची भाजी असू दे, त्याची चवच निराळी असायची. घरात जेवण असतानाही मी अनेकदा मावशींकडून त्यांच्याकडची कुठलीही आमटी असली तरी मागून घ्यायचो आणि तीच खायचो. याबद्दल नंतर आईचा ओरडाही खायला लागायचा बोनसदाखल, ते वेगळंच. पण, या बाबतीत मी काही सुधरायचो नाही.
कुठलाही सणवार असो, त्यावेळी वाड्यातल्या सगळ्या फॅमिली मावशींच्या नेतृत्वाखाली एकत्र असायच्या. कुणाच्याही मुलाचा वाढदिवस असो अगर अन्य कार्यक्रम, सारा वाडा त्या आनंदात सामील झालेला असायचा. रविवारचं मटण कुणाच्याही घरी असो, सुक्याची आणि रश्श्याची एकेक वाटी, प्रत्येकाच्या घरी पोहोच व्हायचीच. कुणाच्या घरी अचानक पाहुणे आले तर त्यावेळी ज्याच्याकडे जे उपलब्ध असेल ते, म्हणजे कुठं लागणारी साखर, कमी पडणारी चहापूड, अगदी दुधाचं फुलपात्र सुद्धा, संबंधिताच्या घरी गरजेनुसार किचनच्या खिडकीतून हळूच पोहोच झालेलं असायचं.
ईद आणि ऊरुसाच्या वेळी तर मधले दरवाजे उघडून मावशींचं आणि आमचं घर एकच झालेलं असायचं. वाड्यात विटांच्या चुलीवर मावशी आणि वाड्यातल्या बायका भराभरा भाकऱ्या थापत आणि आमच्या समोरच्या खोलीत पुरूषांच्या आणि मागच्या खोलीत बायकांच्या पंगती उठत असत. बाळूमामाचं लग्न झालं तर नवीन नवरी असलेल्या मामींना पहिल्यांदा आमच्याच घरात बसविलेलं होतं. अगदी मुँहदिखाईचा कार्यक्रमही तिथंच पार पडलेला. नव्या मामीचा हा कौतुकसोहळा पाहताना आम्हा मुलांनाही मोठी मौज वाटत होती. आता याच खोल्यांमध्ये त्यांचा संसार थाटलेला आहे. या तमाम मामी लोकांशीही माझा जुळलेला जिव्हाळा आजही कायम आहे.
वाड्यातल्या पठाण भाभींचा गोट्या माझ्यापेक्षा एक-दोन वर्षांनी लहान असेल, पण तो माझा एकदम मस्त खेळगडी होता. त्याला मोठी शबनम आणि छोटी शानूर या दोन बहिणी होत्या. वाड्यातल्या वाड्यात क्रिकेट खेळणं हा आमचा आवडीचा भाग होता. कागले काकांची नजर चुकवून छपरावर अडकलेला बॉल काढण्यासाठी आम्हाला कराव्या लागणाऱ्या कसरतींमध्ये एक वेगळंच थ्रील असायचं. पठाण भाभींना पिच्चर बघायचा मोठा शौक. कारण त्या निमित्तानं का होईना, त्यांना थोडा वेळ घराबाहेर पडता येत असे. कागलमधलं एकमेव प्रेमचंद टॉकीज (त्यावेळी तशी एक तंबू टाकीही होती कागलात.) हा त्यांचा आधारस्तंभ होता. दुपारी तीनच्या खेळाला त्या गेलेल्या आहेत, हे गोट्याला साडेपाचला शाळेतून आल्यावर समजायचं. आणि भाभी सहाच्या सुमाराला परतल्या की, या मायलेकरांची जुगलबंदी हा साऱ्या वाड्यासाठी मौजेचा भाग असायचा. तुमना हमेशा मुझकुच छोडके जातीया, असं म्हणत गोट्याचं पसरलेलं भोकाड आणि पठाण भाभींचं त्याला समजावणं, हे आठ-पंधरा दिवसांतून ठरलेलं असायचंच. एकदा रडण्याच्या ओघात मैं आज अब्बाकुच बताऊँगा असं गोट्यानं म्हटल्यानंतर भाभींनी त्याच्यावर स्वहस्ते जो काही प्रेमवर्षाव केला होता की यँव रे यँव... गोट्याची बोलतीच बंद.
पण, एरव्ही पठाण भाभी म्हणजे एक प्रेमळ व्यक्तीमत्त्व होतं. माझ्या धाकट्या भावावर त्यांचं जीवापाड प्रेम. एक तर जन्मल्यापासून नाजूक प्रकृतीचा असल्यानं आजारपण त्याच्यासोबतच असायचं. त्यामुळं सारखा रडत असायचा. आईबाबा, आजीचा जीव त्याला सांभाळताना कासावीस व्हायचा. कागले मावशींपासून साऱ्या वाड्याला त्याची सारखी चिंता असायची. कागले मावशींनी तर त्याला उंबऱ्यावर बसवून आठवड्याला एक या हिशोबानं गार पाण्याच्या तीन घागरी त्याच्या डोक्यावर रिकाम्या केल्या होत्या. तर, अशा माझ्या बंधूला जावळ एकदम भरपूर होतं. आई घरी कामात असेल त्यावेळी पठाण भाभी सरळ त्याला उचलून आपल्या घरी घेऊन जात. त्याच्या आंघोळीपासून ते त्याला जेवण भरण्यापर्यंत सारं काही त्याच करत. आंघोळ घालून कित्येकदा त्याची छान वेणी घालत आणि बरेचदा शानूरचा फ्रॉक घालून अशा तयार करत की, तो जणू मुलगीच वाटायचा. भाभींकडे स्वारी रमायचीही मस्त. त्यातही खेळायला शबनम दीदी आणि शानूर दीदी असायच्याच.
या शबनमच्या वेंधळेपणाचे किस्से वाड्याला वेळोवेळी अनुभवायला मिळत. पठाण भैय्या कोल्हापूरला सर्व्हीसला जायचे. भाभींनी घरातल्या इतर कपड्यांबरोबर त्यांचे ऑफिसचे कपडेही धुवून वाड्यात बाहेर दोरीवर वाळायला टाकले होते. संध्याकाळी शबनम शाळेतनं आल्यावर त्यांनी तिला बाहेरचे पप्पांचे कपडे इस्त्रीला टाकून यायला सांगितलं. शबनमनं कपडे इस्त्रीला टाक, एवढंच ऐकलं आणि दोरीवर वाळत घातलेले त्यांचे अगदी चड्डी-बनियानसकट सारे कपडे कोपऱ्यावरच्या भाऊमामांना इस्त्रीसाठी देऊन टाकले. नेहमीचं गिऱ्हाईक असल्यानं भाऊमामांनी कपडे ठेवून घेतले आणि नंतर पाहतात, तर त्यात अंतर्वस्त्रांसकट सगळे कपडे. त्या काळी मुळातच कपड्यांना फार क्वचित इस्त्री करत असत. त्यातही हे असले सारे कपडे इस्त्रीला येण्याची शक्यता दुर्मिळच. भाऊमामांच्या आयुष्यातही असा प्रसंग कदाचित पहिल्यांदाच आला असावा. तेही आता काय करावं, या विवंचनेत पडलेले. तेवढ्यात संध्याकाळच्या वेळी त्यांना घरी परतणारे पठाण भैय्या दिसले. त्यांनी भैय्यांना हाक मारुन ह्ये सगळे कपडे इस्त्री करायचे काय?’ म्हणून विचारलं. घरातले सगळे कपडे भाऊमामांच्या इस्त्रीच्या टेबलावर बघून आधीच तापट असलेल्या भैय्यांचं डोस्कं तिथंच सणकलं. आपल्या ऑफिसचे दोन ड्रेस भाऊमामाकडं ठेवून बाकीचे कपडे गोळा करून भैय्या घरी आले आणि... तुम्ही इमॅजिन करू शकता शबनम आणि पठाण भाभींना कोणत्या दिव्य प्रसंगाला सामोरं जावं लागलं असेल ते!
शबनमचा आणखी एक पॉप्युलर आणि याचि देही, याचि डोळा पाहिलेला दुसरा किस्सा म्हणजे एकदा भैय्यांनी तिला ब्रेड आणायला पाठवलं तो. सुटे नव्हते म्हणून शंभराची नोट तिला दिलेली. विचार करा, आजही शंभर रुपयांना बऱ्यापैकी ब्रेड मिळतो. हा किस्सा तर साधारण तीसेक वर्षांपूर्वीचा! घरातली एक बास्केट आणि शंभराची नोट घेऊन शबनम बेकरीत गेली. बेकरीवाल्याला शंभर रुपये देऊन तिनं त्यांच्याकडे शंभर रुपयांचे ब्रेड मागितले. घरी जोरदार पार्टी आहे वाटतं?’ असं म्हणत बेकरीवाल्यानं तिच्या बास्केटमध्ये बसतील तेवढे ब्रेड घातले. वरच्या रकमेच्या लाद्या व्यवस्थित बांधून तिच्या दोन्ही काखांत बसतील अशा पद्धतीनं चार चार लाद्याही बांधून दिल्या आणि सांभाळून जायला सांगितलं. साऱ्या रस्ताभर ब्रेडच्या एवढ्या सगळ्या लाद्यांचं ओझं सांभाळत शबनम बिचारी अखेरीस धापा टाकत कशीबशी वाड्याचा मोठा दरवाजा ढकलून आत आली. तिचं ते सारं विश्वाचं ओझं सांभाळल्यासारखं रुप पाहून वाड्यातले सारेच जणू हतबुद्ध झाले. इतके ब्रेड कशासाठी, हा प्रश्न रस्त्यावरच्या येणाऱ्या जाणाऱ्यांप्रमाणंच आता वाड्यातल्या लोकांनाही पडला. तेवढ्यात पठाण भैय्यांची नजर तिच्यावर पडलीच. घरी पोहोचल्यावर जग जिंकल्याचा शबनमचा आनंद भैय्यांच्या जमदग्नि अवतारानं फार काळ टिकू दिला नाही. भैंचोद, मला काय हिथं बेकरी टाकायची हाय काय? एक ब्रेड आणायला सांगिटलं, तर आणली हिनं बेकरीच उचलून.. असं म्हणत पुढची पंधरा-वीस मिनिटं भैय्यांनी त्यांना ज्ञात असलेल्या समस्त सभ्य शब्दांचा तिच्यावर वर्षाव केला. पुन्हा बेकरीत जाऊन बेकरीवाल्याची समजूत काढून त्याला एक सोडून बाकीचे सारे ब्रेड परत घ्यायला राजी करण्याचं आणखी एक दिव्य त्यांना पार पाडावं लागलं, ते वेगळंच! एक मात्र होतं, शबनम ही खरोखरच एक गोड मुलगी होती. तिच्या वेंधळेपणासह ती साऱ्यांना हवीहवीशी वाटायची.
हे सारं असलं तरी, मी वाट पाहायचो ती दिवाळी आणि मेच्या सुट्ट्यांची!  कारण या काळात कागले काकांची पुण्याची सलीम, साहील आणि सायरा आणि इस्लामपूरची मोनू आणि सलील ही नातवंडं तिथं यायची. सुट्टीच्या काळातली ही माझी भन्नाट आणि एकदम व्हर्सटाइल मित्रकंपनी असायची. त्यांच्यासमवेतचे आमचे सुटीतले उपक्रमही वैविध्यपूर्ण असायचे. मोनू आणि सलील हे दोघं भाऊ एकदम सिन्सिअर कॅटेगरीतले. मोनूचं आणि माझं खूप जमायचं, विविध विषयांवर. पण, सलील हा आमच्यापेक्षा लहान असून सिन्सिरिटीच्या बाबतीत बापच होता आमच्या सगळ्यांचा. त्याचं वागणं, बोलणं असं सारंच एकूण तेव्हापासूनच एकदम परफेक्शनिस्टच्या लेव्हलचं असायचं. त्याला वाचनाचीही दांडगी आवड होती. त्याचे जोक्सही त्यामुळं एकदम ॲकेडेमिक स्वरुपाचे असायचे, जे झेपायला अवघड असायचे. मोनू त्या मानानं झेपणारा होता. अभ्यास पहिला, बाकी सब उसके बाद, या विचारसरणीचा. सुटीतही अवांतर वाचनावर त्याचा भर असायचा. हा आम्हा दोघांना जोडणारा एकदम समान धागा होता. तो त्याच्याकडची पुस्तकं घेऊन यायचा आणि मी माझ्याकडची. आणि ती एक्स्चेंज करून सुटीत वाचनाचा आनंद आम्ही खऱ्या अर्थानं द्विगुणित करायचो.
मात्र, सलीम, साहील अन् सायरा आले की वाड्याचा आलमच काही वेगळा असायचा. खरं तर, वाड्यावर दहशत असायची ती सलीमच्या आगमनाचीच. सलीम मुळातच आक्रमक आणि पराक्रमवादी होता. वाड्याला हैराण करणारे अनेक पराक्रम तो दर सुटीमध्ये गाजवित असे. एकदा आल्या आल्या तो वाड्याच्या कॉमन संडासमध्ये गेला. बाहेर येता येता पाण्याचा कॉक हातात घेऊनच आला आणि टाकीतलं सारं पाणी धो-धो वाहून जाताना पाहण्याखेरीज वाड्याच्या हातात मात्र काहीच उरलं नव्हतं. कागले काकांना दुरुस्तीचं काम लागलं, त्याच्या या कर्तबगारीमुळं. एकदा क्रिकेट खेळताना चेंडू काढायला छतावर चढला आणि पाय घसरून थेट खाली पडला. पुढची सारी सुटी हात-पाय प्लास्टरमध्ये अडकवून साजरी झाली. त्यामुळे सलीमचं येणं हे अगत्याचं असलं तरी जाताना तो कोणत्या आठवणी मागे ठेवून जाईल, याची काका-मावशींसह साऱ्यांनाच चिंता लागून राहिलेली असायची. साहील मात्र वेगळा होता, शांत होता. दोन्ही गालांवर खळ्या पडणारा, गुटगुटीत आणि हसऱ्या चेहऱ्याचा साहील सर्वांना हवाहवासा वाटायचा. सलीमभैय्यावर त्याचं प्रेम होतं. त्यानं काहीही आगाऊपणा करून रडवलं तर त्याची तक्रार करायचा, पण पुन्हा पुढच्या क्षणी सलीमभैय्या म्हणून त्याच्यासोबत खेळायला स्वारी तयार असायची. यामध्ये छोटी सायरा मात्र खूप समंजस आणि समन्वयवादी भूमिका बजावायची. दोन टोकाच्या दोन भावांना जोडून ठेवणारा महत्त्वाचा धागा होती सायरा. माझंही या दोन्ही टोकांशी खूप उत्तम जमायचं. सलीमकडं खेळण्याच्या भन्नाट कल्पना असायच्या. वाड्यासमोरच्या गैबीत गोट्या, क्रिकेट, छापा, लपाछपी, पकडापकडी असे अनेक खेळ खेळत असू. आमचा सुटीतला फार महत्त्वाचा आधार ही गैबी होती. तिच्या अंगाखांद्यावर, समाधीच्या आजूबाजूनं आम्ही खेळत असायचो.
छापा हा सलीमचा आणि त्याच्या योगानं आमचाही आवडीचा खेळ होता. छापांसाठी खऱ्या अर्थानं उकिरडे फुंकत सिगारेटची रिकामी पाकिटं शोधत आम्ही फिरलो आहोत. त्यावेळी हनीड्यू अर्थात पिवळा हत्ती हा कॉमन ब्रँड होता, म्हणून आमच्या खेळात त्याची किंमत कमी होती- पाच रुपये. त्यानंतर ब्रिस्टॉल, त्याची किंमत दहा रुपये. त्यावर चारमिनार, वीस रुपये. त्यावर विल्स - पन्नास रुपये. फोर स्क्वेअर - शंभर रुपये. गोल्ड फ्लेक- एक हजार. मार्लबोरो- दहा हजार. कॅपस्टन- एक लाख. ५५५- पाच लाख वगैरे. अशा प्रकारे सिगारेटचा ब्रँड जितका दुर्मिळ तितकं छापांमध्ये त्याचं मूल्य मोठं असायचं. आम्हाला कागलमध्ये पहिले दोन ब्रँडच लई सापडायचे. गोल्ड फ्लेकही क्वचित सापडायची. बाकी सगळा तीस छाप आणि संभाजी बिडीचाच कचरा हाती यायचा. आता कुठल्याही प्रकारचं धूम्रपान हे आरोग्याला घातकच असलं तरी लोकं सिगारेट सोडून बिड्या कशाला ओढतात, आणि ओढून ओढून ब्रिस्टॉल आणि पिवळा हत्तीच का ओढतात, असे प्रश्न त्या काळी मला पडायचे. त्यामुळं वरच्या रकमांचे ब्रँड पुण्याहून आणायची जबाबदारी सलीमवर असायची. सुटीव्यतिरिक्तच्या काळात गोट्या आणि छापांच्या खजिन्याचा खजिनदार मी असायचो, इतका सलीमचा माझ्यावर विश्वास होता. मीही त्याला कधी तडा जाऊ दिला नाही. आता या छापांचा डाव जिंकायचा, तर त्यासाठी उत्तम दर्जाचे व्हट्टेल (अणुकुचीदार दगड) आपल्याकडे असणं, ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट असायची. मग, त्यावर बाजारात जाऊन २५ पैसे तास या दरानं छोट्या सायकली भाड्यानं घेऊन त्या पळवत आम्ही यशवंत किल्ल्यावर पोहोचायचो. कागलचं वैभव असलेल्या या यशवंत किल्ल्याची त्यावेळी केवळ खिंडारंच उरलेली होती. आम्ही सायकली तशाच त्या खंडारांतनं दामटायचो. चांगल्यातले चांगले व्हट्टेल उचलून आमच्याजवळच्या प्लास्टीक पिशव्यांत भरायचो आणि परतायचो. एकदा असेच आम्ही मोहिमेवर होतो. किल्ल्याच्या पिछाडीला चार पुरूष उंचीचा कठडा होता. त्या कठड्यांवर आम्ही सायकली घातलेल्या होत्या. सगळ्यात मागं माझी सायकल होती. माझ्या सायकलचं मागचं चाक घसरलं आणि मी त्यावरुन खालच्या दगडात पडून माझा कपाळमोक्ष होणार, हे जवळ जवळ निश्चित होतं. माझे दोन्ही पाय कठड्यावर, एक हात सायकलच्या हँडलवर आणि दुसऱ्या हातानं कसा कोण जाणे शेजारच्या खिंडारलेल्या भिंतीचा एक दगड मी पकडलेला. अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत मी सलीमला जीव खाऊन हाक मारली. त्यानं मागं पाहिलं, माझी अवस्था बघून त्यानं त्याची सायकल अक्षरशः सोडून दिली आणि कसलाही मागचा पुढचा विचार न करता पळतच त्या कठड्यावर आला आणि जीव खाऊन सायकलसह मला सुरक्षितपणे वर ओढलं. पाचवी-सहावीतलं वय ते, पण मित्रासाठी धावून येणारा मित्र मला सलीमच्या रुपात पहिल्यांदा दिसला. सलीम कसाही असला तरी मला आवडायचाच, त्याच्या त्या वेळच्या मला वाचविण्यासाठी केलेल्या धडपडीनं तर त्यानं मला जिंकूनच घेतलं. ही गोष्ट या वेळेपर्यंत आमच्या दोघांच्याही घरी ठाऊक नाहीये. सांगितलं असतं तर काय झालं असतं, याची आम्हा दोघांनाही कल्पना होती. त्यानंतर आम्ही पुन्हा कधी किल्ल्याकडं फिरकलो नाही.
छापा खेळून दमल्यानंतर एका दुपारी आम्ही गैबीच्या कट्ट्यावर बसल्या बसल्या चिंचेचा खाली पडलेला कोवळा पाला, फुलं (त्याला कोंबडं म्हणायचो) आम्ही खात होतो. तो तसाच खाण्यापेक्षा त्यात चटणीमीठ घालून कुटून खाऊ या, अशी कल्पना सलीमला सुचली. साहजिकच सर्वांनी उचलून धरली. मी आमच्या घरातनं हळूच चटणीमीठ आणायची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. वाऱ्यानं पाला उडू नये, म्हणून गैबीच्या आडोशाला आम्ही तो हातातल्या व्हट्टेलनी कुटायला सुरवात केली. पण, हे आमचं कुटणं सुरू असताना कशी कोण जाणे एक ठिणगी गैबीच्या गलेफावर उडाली आणि त्यानं पेट घेतला. काही समजायच्या आत हे सारं घडल्यानं आम्ही सारी मुलं सैरभैर झालो. गैबीच्या समोरच एक गादी कारखाना होता. त्याच्या मालकांचं नाव सलीमचाचा. आता काय करायचं, हे न समजल्यानं आम्ही सलीमचाचाकडं धाव घेतली. चाचाही पटकन आले आणि त्यांनी आग विझवली. आधी थोडे रागावले, पण मुलांनी हे मुद्दामहून केलेलं नाही, हे त्यांच्या लक्षात येऊन त्यांनी आमचीच समजूत घातली. एव्हाना हा वृत्तांत वाड्यापर्यंतही पोचलेला होताच. काकांच्यासकट सगळ्यांचे आईबाप झाडून गैबीत दाखल झाले. एकमेकांतली तेढ वाढविण्यासाठी अशा गोष्टींचा अत्यंत हुशारीनं लाभउठविता येईल, असा कोणाच्याही मनात विचार येण्याचा तो काळ नव्हता. मोबाईल, सोशल मीडिया नसल्यामुळं लोकही खऱ्या अर्थानं अधिक सोशल होते. अनाकलनीय टोकाच्या जातीय-धार्मिक अस्मितांपेक्षा सर्वच समाजबांधवांचं सामाजिक भान आणि जाणीवा जागृत होत्या. त्यामुळं सलीम चाचांनीच पुढं होऊन त्या सर्वांना समजावून सांगितलं. मुलांची चूक नाही, तर अनवधानानं ठिणगी उडून हा प्रकार झाल्याचं सर्वांना पटलं. वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर सर्वांनी मिळून गैबीला नवा गलेफ आणून घातला आणि त्याची पूजाअर्चा केली. आपल्या अंगाखांद्यावर आम्हा मुलांना आनंदानं खेळू देणाऱ्या त्या गैबीनाथाला आम्ही मुलांनीही मनोभावे हात जोडले आणि क्षमायाचना केली. ... आणि त्याचवेळी सायंकाळची अजान झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा